नगराध्यक्ष सुनील काळेंच्या पाठपुराव्याला यश : नागरीकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
भुसावळ- तालुक्यातील वरणगाव येथे शिधापत्रिकावरील बंद असलेले धान्य सुरू करण्यासाठी व नवीन शिधापत्रिका मिळण्यासाठी 2 जुलै रोजी वरणगाव शहरात सिद्धेश्वर नगर, अक्सा नगर, रामपेठ व जुने गावात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वरणगाव शहरातील अनेक नागरीक हे मजुरीचे काम करतात त्यांना पूर्वी शिधापत्रिकांवर धान्य मिळत होते मात्र मिळत असलेले धान्य स्थानिक पुरवठा शाखेने बंद केल्यामुळे मजूर जनतेवर उपासमारीची वेळ आलेली आहे.
शिबिर घेण्याचे लेखी आदेश
बंद असलेले धान्य सुरू करण्यासाठी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, कामगार नेते मिलिंद मेढे, समाधान चौधरी, नगरसेवक रवींद्र सोनवणे यांनी भुसावळचे नायब तहसीलदार संजय तायडे यांची भेट घेतली होती. तसेच मुंबई येथे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांची भेट घेऊन वरणगावला रेशनकार्डासाठी शिबिर घेण्याची विनंती केली होती त्या अनुषंगाने बापट यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव यांना शिबिर घेण्याच्या सूचना दिली होती. त्यानुसार 2 जुलै रोजी वरणगांव शहरात नवीन शिधापत्रिका व बंद असलेले धान्य सुरू करण्यासाठी भुसावळचे प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांनी वरणगांवच्या मंडळ अधिकारी यांना शिबिरासाठी यंत्रणा लावण्याचे लेखी आदेश दिले आहेत.
कागदपत्रांसह हजर राहण्याचे आवाहन
शिधापत्रिकाधारकांना पुर्वी धान्य भेटत होते मात्र धान्य मिळणे बंद झालेले आहे ते धान्य सुरू करण्यासाठी व नवीन शिधापत्रिका तयार करण्यासाठी 2 जुलै रोजी 11 वाजता वरणगावात शिबिर घेतले जाणार आहे. यासाठी नागरीकांनी कागदपत्रासह हजर रहावे, असे आवाहन नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, नगरसेविका, नगरसेवक यांनी केले आहे.