शिबिरामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

0

नागोठणे । महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार रायगडातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री रवीशेठ पाटील, माजी मंत्री नसीम खान, आ. भाई जगताप, प्रवक्ते रत्नाकर महाजन, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. चारुलता टोकस, प्रदेश सरचिटणीस मुश्ताक अंतुले, माणिक जगताप, माजी आ. मधुकर ठाकूर, श्याम म्हात्रे, महेंद्र घरत, पुंडलीक पाटील, समीर सकपाळ आदी दिग्गजांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार 10 मार्चला खोपोली येथे होत आहे.

प्रमुख नेतेमंडळीच्या उपस्थितीत हे शिबीर होत असल्याने रोहे तालुक्यातील सर्वच काँग्रेसजनांमध्ये उत्साह संचारला असून, रोहे तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते या शिबिराला उपस्थित राहतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. मध्यंतरी काही काळ जिल्ह्याच्या राजकारणापासून काहीअंशी बाजूला राहिलेले काँग्रेसचे नेते रवीशेठ पाटील, या शिबिराच्या माध्यमातून पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय होणार असल्यामुळे त्यानिमित्ताने स्पष्ट होत असल्याने जिल्ह्याच्या काँग्रेसला निश्‍चितच संजीवनी येणार असल्याचे बोलले जात आहे. रोहे तालुक्यातील प्रत्येक गावातील काँग्रेस कार्यकर्ता शिबिरात सहभागी होण्यासाठी आतुर झाला असून तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहतील.