शिरपूर:शहरात रविवारी एकाच दिवशी 25 रुग्णांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील दिवसेंदिवस कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी शहरातील जनता आणि राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकार्यांच्या विनंतीवरून शिरपूर-वरवाडे नगरपरिषद क्षेत्रात सोमवारपासून पाच दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथील 41 अहवालांपैकी 25 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात खंबाळे जि.प.शाळेजवळ 10, शहरातील गुरुदत्त कॉलनी 3, सिद्धिविनायक कॉलनी 3, झेंडा चौक 2, पाटीलवाडा 1, कुंभार टेक 1, चौधरी गल्ली 1, फुले चौक 1, शिंपी गल्ली 1, इतर 2 असे 25 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाचा वाढत्या संख्येमुळे जनतेच्या मागणीनुसार 22 ते 26 जून असे पाच दिवस प्रशासनाकडून जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
या काळात दवाखाना आणि त्यांच्याशी संलग्न मेडीकल स्टोअर्स सुरु राहतील. इतर मेडीकल स्टोअर्स व कृषी विषयक दुकाने सकाळी 8 ते 12 या काळात सुरु राहतील. दूध डेअरी सकाळी 7 ते 8 व सायंकाळी 6 ते 7 या काळात सुरु राहतील. इतर सर्व दुकाने बंद राहतील. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. मास्कचा वापर करावा. हात दिवसभरात सात ते आठ वेळा साबणाने स्वच्छ धुवावे. एकमेकांमध्ये कमीत कमी पाच फूट अंतर ठेवावे. आरोग्य पथकास खरी माहिती देऊन सहकार्य करावे, असे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे.