शिरपूर तालुक्यात एक लाखांचा गांजा जप्त : दोघांना अटक

शिरपूर : शहर पोलिसांनी शिरपूर तालुक्याचे मुंबईतील गांजाचे कनेक्शन पुन्हा उघड केले असून मुंबईच्या डिसूझा नामक गांजा तस्करसह तालुक्यातील उमर्दा येथील युवकाच्या मुद्देमालासह मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई शिरपुर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून करण्यात आली. दरम्यान, संशयीताना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

दोघे गजाआड
या कारवाईत 86 हजार 100 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करीत मिथुन जवल्या पावरा (29, रा.उमरदा, ता.शिरपूर, जि.धुळे) व लेस्टर अँथोनी डिसुजा (37, रा.लोचर गाव, मड आयलँड, मलाड वेस्ट, जि.मुंबई) यांना अटक करण्यात आली. बॅगेत व प्लॅस्टीकचे गोणीत 52 हजार 100रुपये किंमतीचा 10 किलो सुका गांजा आढळून आला तर दोन मोबाईल व मोटारसायकल सह 86 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख, एपीआय गणेश फड, संदीप मुरकुटे, नरेंद्र शिंदे, स्वप्नील बांगर, अमित रनमळे, भूषण कोळी आदींच्या पथकाने केली.