शिरपूर नगरपरिषदेने राबविलेली स्वच्छता मोहिम बनली एक लोक चळवळ

0

शिरपूर । शिरपूर वरवाडे नगरपरिषदेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत खूपच उत्कृष्ट काम केले असून सर्वत्र प्रचंड उत्साह दिसून येत आहे. फक्त शिरपूरकर म्हणून सर्वच शहरवासीयांनी या स्वच्छता मोहिमेत अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलाय. शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांच्या भिंती, कम्पाऊंड हे अनेक रंगसंगतीने व स्वच्छतेच्या संदेशांनी उठून दिसत आहेत. शहरातील नागरिक महिला, पुरुष, युवावर्ग सर्वांनी मनापासून स्वच्छता मेहिमेला आपलेसे केले आहे. यात अनेक शाळांच्या चिमुकल्यांनी व महाविद्यालयाच्या मुलामुलींनी, शिक्षक वर्ग, इतर कर्मचारी यांचा उत्साह फारच कौतुकास्पद दिसून आला.

प्रत्येक घरी डस्टबीनचे वाटप
नगरपरिषदेने गेल्या दहा वर्षापासून हा उपक्रम अखंडपणे सुरु ठेवला आहे. शहरात राबवित आहे. 100 टक्के कचरा संकलन होत असल्याने शिरपूरकरांना उत्तम आरोग्य लाभत आहे. घंटागाड्यांना जीपीएस सिस्टीम बसविण्यात आल्याची बाब तर सर्वदूर कौतुकाचा विषय ठरत आहे. नगरपरिषदेने शहरातील प्रत्येक घरी डस्टबीनचे वाटप केल्यामुळे ओला व सुका कचरा विलगीकरण खूप वेगाने व यशस्वीरीत्या झाले आहे.

100 टक्के कचरा संकलन
स्वच्छ शिरपूर, सुंदर शिरपूर हा संदेश 100 टक्के खरा ठरला आहे. शिरपूर वरवाडे नगरपरिषद शहर स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर ठरली आहे व ही बाब शिरपूरकरांसाठी खूपच आनंददायी आहे. नगरपरिषदेच्या घंटागाड्यांमार्फत गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक वार्डातून घरोघरी जाऊन 100 टक्के कचरा संकलन होण्याची बाब राज्यात आदर्शवत आहे.

एकत्रीत प्रयत्नांना यश
शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.दिपक सावंत, प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी, नगर अभियंता माधवराव पाटील, सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रयत्नाने स्वच्छतेबाबत उत्कृष्ट कामे सुरु आहेत. लोकप्रतिनिधी ,प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांनी योग्य ती साद दिल्यास आदर्श निर्माण होऊ शकतो हेच यातून दिसून येत आहे.