शिरपूर : विद्यार्थ्यांना उज्वल भवितव्यासाठी क्रीडा क्षेत्रात करीअर खूप संधी आहेत. निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने क्रीडा क्षेत्राला आपलेसे करावे. सर्व खेळाडूंना संस्थेतर्फे सर्व सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत. संस्थेचे अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य स्तरावर चमकले असून शिरपूरकरांसाठी ही बाब भूषणावह आहे. शिरपूरचे नाव देशभरात व्हावे यासाठी आमदार अमरिश पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करण्यात येत आहे. संस्थेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात नैपुण्य मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे प्रतिपादन आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष भुपेश पटेल यांनी आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाच्या मम्मीजी क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
1424 खेळाडूंचा सहभाग
क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन हेमंतबेन आर.पटेल यांच्याहस्ते पटेल मेन बिल्डींगच्या मैदानावर करण्यात आले. या क्रीडा महोत्सवात संस्थेच्या सर्व प्राथमिक शाळांमधील तब्बल 1424 खेळाडूंनी सहभाग नोंदविला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यमान नगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, कक्कूबेन पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संस्थेचे विश्वस्त बबनलाल अग्रवाल, बालाजी संस्थानचे उपाध्यक्ष गोपाल भंडारी, शिरपूर पिपल्स बँकेचे चेअरमन योगेश भंडारी, शिरपूर मर्चंट बँकेचे चेअरमन प्रसन्न जैन, संस्थेचे विश्वस्त फिरोज काझी, पिपल्स बँकेचे व्हाईस चेअरमन श्रेणिक जैन, डॉ.अर्जून पटेल, डॉ.शाम राजपूत, संस्थेचे व्यवस्थापक डॉ.उमेश शर्मा, टी.आर.सी. जॉईंट डायरेक्टर अनिमा सक्सेना, क्रीडा संघटनेचे रावसाहेब चव्हाण, डॉ.राजू सनेर आदी मान्यवर उपस्थित होते.
दोन गटात क्रीडा महोत्सव
क्रीडा स्पर्धा 1 ली 2 री आणि 3 री 4 थी अशा दोन गटात संपन्न झाली. इ.1 ली, इ.2 री चे मुले व मुलींच्या प्रथम गटासाठी लिंबू चमचा (50 मी.), पोत्याची शर्यत (50 मी.), तीन पायांची शर्यत (50 मी.), रिंग टाकणे (7 फूट), बादलीत चेंडू टाकणे (10 मी.), तसेच इ.3री व इ.4 थी च्या मुले, मुलींच्या गटासाठी 100 मी. धावणे, 50 मी. लंगडी, खो-खो, कॅरम, बुद्धीबळ, बॅडमिंटन, दोरी उडी (1 मिनिट) या स्पर्धा घेण्यात आल्या.
यशस्वीतेसाठी यांनी केले प्रयत्न
महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सीईओ डॉ.उमेश शर्मा, सर्व मुख्याध्यापक, क्रीडा समन्वयक प्रा.डॉ.विनय पवार, राकेश बोरसे, विविध खेळांचे 19 प्रशिक्षक, 24 क्रीडा शिक्षक यांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन विवेकानंद ठाकरे व उज्वला पाटील यांनी केले. आभार आर.बी.खोंडे यांनी मानले.