शिरपूर । शहरात दैनंदिन कामांसाठी येणारे ग्रामस्थ, रूग्णांचे नातलग, विद्यार्थी यांची भूक भागविण्यासाठी आ. अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या पुढाकाराने ‘पप्पाजी की थाली’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ अक्षय्य तृतियेच्या दिवशी हेमंतबेन पटेल (मम्मीजी) यांच्या हस्ते करण्यात आला. शिरपूर टेक्सटाईल पार्क चेअरमन तथा नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या हस्ते विधीवत पूजा, श्री सत्यनारायण महाराज पूजा करण्यात आली.मुंबई येथील महेंद्रकुमार मनहरलाल संघवी मेमोरिअल ट्रस्ट व मुकेशभाई पटेल एज्युकेशन सोसायटी यांच्यातर्फे राबवण्यात येणार्या या उपक्रमाची अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर बुधवारी (ता.18) सुरवात करण्यात आली.
गरजूंना अत्यल्प दरात जेवण
शिरपुरात पालिकेने इंदिरा गांधी इस्पितळाच्या माध्यमातून आरोग्य, उपचारांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तेथे दाखल रूग्णांना भेटण्यासाठी तसेच सोबतीसाठी नातलग मोठ्या संख्येने येतात. शहरात विविध शाळा-महाविद्यालये असून ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणार्या विद्याथर्यांचे प्रमाणही मोठे आहे. याशिवाय पोलीस ठाणे, तहसील कार्यालय, पंचायत समिती, प्रांताधिकारी कार्यालय येथे दैनंदिन कामासाठी लक्षणीय संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती असते.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी हेमंतबेन पटेल (मम्मीजी), आ. काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल, कमलकिशोर भंडारी, बबनलाल अग्रवाल, गोपाल भंडारी, बाजार समिती सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, प्रसन्न जैन, योगेश भंडारी, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुभाष कुलकर्णी, कैलासचंद्र अग्रवाल, शहराध्यक्ष नितीन गिरासे, दिलीप लोहार, नाटुसिंग गिरासे, काँग्रेस ओबीसी जिल्हाध्यक्ष शामकांत आदी पदाधिकारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
सेवाभावी तत्वावर सेवा
शिरपूर बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी मोठ्या संख्येने शेतकरी येतात. या सर्व घटकांना दुपारी जेवणाची गरज भासते. हॉटेल्समधील खाद्यपदार्थांचे भडकलेले दर पाहता तेथे जेवण घेणे न परवडणारे ठरते. ही बाब उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या लक्षात आली. त्यांनी आ.अमरीशभाई पटेल, तपनभाई पटेल यांच्याशी चर्चा केली. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सेवाभावी तत्वावर पुरेशा अन्नपदार्थांची अत्यल्प दरात सुविधा उपलब्ध करून देण्याचा पर्याय स्विकारण्यात आला.
20 रूपयांत जेवण
दानशूर व्यक्तिमत्व, शहरातील विविध धार्मिक, सेवाभावी संस्थांचे आश्रयदाते (कै.) रसिकलाल पटेल तथा पप्पाजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या भोजन थाळीला ‘पप्पाजी की थाली’ असे नाव देण्यात आले आहे. अवघ्या 20 रूपयांत गरजूंना पुरेसे जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे. येथील महाराज कॉम्प्लेक्समधील जिल्हा मध्यवर्ती बँकेखाली हे केंद्र आहे. दररोज सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत या केंद्रावर जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.