राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ; संशयित फरार
जळगाव : एका वाहनात सर्व साहित्य घेऊन जंगलात व पिकांमध्ये तसेच निर्मनुष्य भागात कारखाना उभारुन तेथेच बाटल्या पॅकींग करुन त्या परिसरातील हॉटेल, ढाबे व गावात विक्री करणार्या लोकांपर्यंत ही दारु पोहचविणार्या शिरसाळा, ता.यावल येथील चालत्या फिरत्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी कारवाई केली. पथकाला पाहून संशयित नरेंद्र विठ्ठल सोनवणे (28, रा.वढोदा, ता.यावल) हा फरार झाला आहे. संशयिताविरुध्द मुंबई दारु बंदी कायदा 1949 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सापळा रचून पथकाने केली कारवाई
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने भरारी पथकाची स्थापना केली आहे. विभागाच्या अधिकार्यांना यावल तालुक्यातील संशयिताने चालताफिरता कारखाना तसेच शेतात बनावट देशी दारु निर्मिती करण्याचा कारखाना सुरु असल्याची माहिती मिळाली. यानुसार विभागीय उपायुक्त ए.एन.ओहोळ यांच्या आदेशान्वये अधीक्षक सी.पी.निकम, निरीक्षक आय.एन.वाघ, एन.पी.दहिवडे, दुय्यम निरीक्षक आनंद पाटील, व्ही.एम.पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक डी.बी.पाटील, अमोल पाटील, एस.एस.निकम, विजय परदेशी, सागर देशमुख, रघु सोनवणे, व्ही.बी.राजपूत व मुकेश पाटील यांच्या पथकाने बुधवारी शिरसाळा शिवारात सापळा रचून अचानक छापा मारला असता पिकांमध्ये देशी दारु निर्मिती केली जात होती. पथकाला पाहून संशयित नरेंद्र सोनवणे याने पळ काढला. यावेळी पथकाने दारु बनविण्याचे देशी मद्यार्क 35 लीटर, बनावट देशी दारु 35 लीटर, रिकाम्या बाटल्या, प्लास्टीक कॅन, बूच, पॅकींगचे कागदी खोके असे साहित्य जप्त केले. मद्यार्क जागेवरच नष्ट करण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून भुसावळचे निरीक्षक आय.एन.वाघ तपास करीत आहेत.