शिरसोदे गावातील खंडेराव महाराज मंदिराची दानपेटी फोडली

पारोळा : तालुक्यातील शिरसोदे येथील खंडेराव महाराज मंदिरातील दानपेटी फोडून रोकडसह मुद्देमाल लांबवण्यात आला. या प्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पारोळा पोलिसात गुन्हा दाखल
पारोळा तालुक्यातील शिरसोदे गावाच्या बाहेर खंडेराव महाराजांचे मंदिर असून या ठिकाणी मंदिराची देखभाल रवींद्र कन्हैयालाल गुरव पाहतात. शनिवार, 16 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता नेहमीप्रमाणे मंदिर बंद करून कुलूप लावून ते घरी गेले होते. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून मंदिरातील दानपेटीतील तीन हजार 500 रुपयांचह रोकड, अ‍ॅम्प्लिफायर आणि बेन्टेक्सचे दागिने मिळून आठ हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. दुसर्‍या दिवशी रविवार, 17 एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता चोरी झाल्याचे लक्षात आले. रवींद्र गुरव यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार इकबाल शेख करीत आहे.