शिरुरमध्ये सभापती बदलाचे वारे

0

पंचायत समितीच्या उपसभापतीपदासाठी महिलांना संधी!

शिक्रापूर । शिरुर पंचायत समितीच्या सभापती निवडीला 13 मार्च रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. शिरुर पंचायत समितीवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. राष्ट्रवादी काँगेसमधील अंतर्गत तडजोडीनुसार एक वर्षाच्या पुर्ततेनंतर आता सभापती बदलाचे वारे वाहू लागले आहे.शिरुर तालुक्याच्या पंचायत समितीच्या सभापती बदला बरोबरच सर्वांना संधी देण्याचा निर्णय झाला तर उपसभापती बदल होऊन पुन्हा एकदा महिला सदस्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. शिरुर पंचायत समितीचे विद्यमान सभापती म्हणून पाबळ पंचायत समिती गणातील सुभाष उमाप हे काम पाहत आहेत. त्यांनी राजीनामा दिल्यास त्यांच्या रिक्त जागी विश्‍वास कोहकडे यांना संधी मिळणार आहे.

विरोधकांना संधी नाही!
शिरुर तालुक्याचे सभापती पद हे पहिल्या अडीच वर्षासाठी खुल्या वर्गातील पुरुषासाठी राखीव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुभाष उमाप आणि विश्‍वास कोहकडे हे दोघेच निवडून आल्याने दोघांनाही सभापती पदाची संधी मिळणार, हे निश्‍चित झाले होते. भाजप, शिवसेना आणि अपक्षांचे संख्याबळ पूर्ण नसल्याने विरोधकांना कुठलीही संधी मिळण्याची शक्यता नाही.

उमाप यांचा लवकरच राजीनामा
राष्ट्रवादी काँग्रेसने पंचायत समितीच्या निवडणुकीत 8 जागा जिंकत सत्ता मिळवली होती. सभापतीचे उमेदवार हे आंबेगाव विधानसभेला जोडलेल्या 39 गावातून निवडून आल्याने सभापतीपद या भागाला मिळणार होते. यामुळे साहजिकच उपसभापतीपद हे उर्वरीत शिरुर तालुक्याच्या भागात मिळणार होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुभाष उमाप यांनी सर्वात प्रथम सभापतीपदाची संधी मिळावी, अशी मागणी केली होती. पक्षश्रेष्ठींनी उमाप यांना प्रथम संधी देताना एक वर्षासाठी तर विश्‍वास कोहकडे यांना दीड वर्षासाठी सभापतीपदी संधी देण्याचा निर्णय घेतला होता. तर अपक्ष पंचायत समिती सदस्या अर्चना भोसुरे यांनी देखील सुभाष उमाप यांना पाठिंबा दिला होता. या निर्णयानुसार 13 मार्च रोजी सुभाष उमाप यांना सभापतीपदी एक वर्ष पूर्ण होत आहे. यामुळे त्यांचा राजीनामा लवकरच होणे अपेक्षित आहे.

नव्याने होणार निर्णय
राष्ट्रवादीच्या आठ सदस्यांपैकी सहा सदस्य महिला आहेत. विद्यमान उपसभापती म्हणून सणसवाडी गणाच्या मोनिका हरगुडे या काम पाहत आहेत. पक्षात सर्वांना संधी देण्याचे ठरल्यास हरगुडे यांना राजीनामा द्यावा लागेल. यानंतर उपसभापती पदाची संधी शिरुर-हवेली या मतदार संघातील निवडून आलेल्या महिलेला मिळेल. अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा सभापती आणि उपसभापती पदाबाबत नव्याने निर्णय होतील. यामुळे आता शिरुर राष्ट्रवादीत सभापती आणि उपसभापती बदलाचे वारे वाहू लागले आहे.