शिरुर तालुक्यात होणार कोट्यवधींची विकास कामे

0

शिरुर । सर्व सामान्यमाणसाचे हित लक्षात घेऊन आमदार बाबुराव पाचर्णे यांनी तालुक्यात विविध लोकहिताची विकासकामे केली आहेत. या कामांमुळे शिरुर शहराच्या वैभवात भर पडणार असल्याचे मत पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे यांनी व्यक्त केले. शिरुरच्या तहसील कार्यालयाजवळील ध्वजस्तंभाजवळील जागेत पेव्हिंग ब्लॉक बसविण्याच्या कामाचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य सरोदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. तहसीलदार रणजित भोसले, संदिप जठार, राजेंद्र कुंटे, राजेंद्र गदादे, विक्रम पाचुंदकर, मंगेश खांडरे, संदिप गायकवाड, नितीन पाचर्णे, अभिजीत पाचर्णे आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते.

51 लाखांचा निधी मंजूर
तहसील कार्यालयाजवळील जागेत स्वातंत्र्य, प्रजासत्ताक तसेच महाराष्ट्र दिनी ध्वजवंदन केले जाते. या ठिकाणी बसण्यासाठी चांगली व्यवस्था करावी, यासाठी पेव्हिंग ब्लॉक बसविण्याची मागणी नागरिकांनी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्याकडे केली होती. 15 ऑगस्ट 2017 रोजी पाचर्णे यांनी याबाबत नागरिकांची बैठक घेऊन ध्वजस्तंभाजवळील जागेत 26 जानेवारी 2018 च्या आगोदर पेव्हिंग ब्लॉक, बसण्यासाठी चांगली सुविधा निर्माण करण्याचा शब्द दिला होता. हा शब्द सार्थ ठरवत पाचर्णे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 51 लाख 75 हजार रुपयांचा निधी मंजूर केला. इतकेच नव्हे तर भूमीपूजन करून कामही सुरू करण्यात आले आहे.

तालुक्यात विकास पर्व
याबाबत शिरुरवासीयांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. आमदार पाचर्णे यांनी शिरुर-हवेलीतील विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी आणल्याने कोटींची विकासकामे सुरू झाली आहेत. त्यामुळे शिरूर तालुक्याच्या वैभवात भर पडणार असल्याचे सांगत तालुक्यात विकासगंगा आणल्याने विकासपर्वच सुरू झाले असल्याचे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे यांनी केले.