शिरूरमधील ‘जय किसान कृषी प्रदर्शन’ पाहण्यासाठी जिल्हाभरातील नागरिकांची गर्दी

0

शिक्रापूर । शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे आयोजित ’जय किसान कृषी प्रदर्शना’ला शेतकर्‍यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. तालुक्याबरोबरच जिल्ह्याच्या विविध भागांतील शेतकरी हे प्रदर्शन पाहण्यासाठी भेट देत असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे व संचालक आबाराजे मांढरे यांनी दिली.

सुधारीत औजारे खरेदी करण्याकडे कल
शेतीसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाने सुधारीत औजारे खरेदी करण्याकडे शेतकर्‍यांचा जास्त कल असल्याचे दिसून येते. ठिबक सिंचन संच, त्यातील विविध प्रकार, सेंद्रिय खतांचा वापर, शेतीसंदर्भातील पिकांच्या उत्पादनवाढीसाठी असणारी माहितीपुस्तिका उपलब्ध असणार्‍या स्टॉलवर गर्दी होत आहे. कृषी प्रदर्शनाला होणारी गर्दी लक्षात घेता अनुचित घटना घडू नयेत, यासाठी 15 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांन कृषी प्रदर्शनाची सहल
सहलींचे आयोजन करून आजूबाजूच्या परिसरातील शाळा प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना घेऊन येत आहेत. विद्यार्थ्यांना शेतीबाबत माहिती करून देणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. कृषी अवजारे व मशीनरी, ठिबक व तुषार सिंचन, आधुनिक किटकनाशके, रासायनिक व सेंद्रिय खते, डेअरी व फूड प्रॉडक्ट्स, पशुखाद्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गृहोपयोगी वस्तू, महिला बचतगटाचे स्टॉल तसेच इतरही गृहपोयोगी वस्तूंचे स्टॉल याठिकाणी आहेत.

कृषी विषयावर चर्चासत्र
स्प्रे पम्पापासून ते ट्रॅक्टरपर्यंत, बी बियाणांपासून ते कृषी प्रक्रियेपर्यंत, टू व्हिलरपासून ते फोर व्हीलरपर्यंत तसेच नवीन घरापासून ते अत्याधुनिक फ्लॅटपर्यंत तसेच गृहपोयोगी वस्तू व उत्पादने, महिला बचत गटांच्या विविध वस्तू व खाद्यपदार्थ असे 150 पेक्षा जास्त स्टॉल या प्रदर्शनात उपलब्ध आहेत. या प्रदर्शनात कृषी विषयक चर्चासत्रे, कृषी बँकींग व कृषी योजना, कृषी विषयक संशोधनाची पुस्तके व प्रकाशकांचे स्टॉल्सही उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील शेतकरीही या स्टॉलवर गर्दी करत आहेत.