शिरूर । शिरूर बस स्थानकातील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करावी, स्थानकाच्या आवारात पडलेल्या खड्यांबाबत तसेच येथील पोलीस चौकी तातडीने सुरू करावी, अन्यथा पंधरा दिवसानंतर मनसे स्टाइलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष स्वप्नील माळवे यांनी दिला. यावेळी अविनाश घोगरे, संदीप कडेकर, प्रवीण तुबाकी, प्रसन्न भोसले, अनिकेत घोगरे, सचिन जाधव आदी उपस्थित होते.
आगार व्यवस्थापक एस. के. धुमाळ यांची भेट घेऊन येथील समस्यांबाबत मनसेच्या कार्यकर्त्यांनी चर्चा केली. बस स्थानक परिसरात पडलेल्या मोठ मोठ्या खड्ड्यांमुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांचे हाल होत असून त्यामध्ये बस आदळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकी व परिसरात घाण पसरल्यामुळे प्रवाशांना विकतच्या पिण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्याचबरोबर बाहेर गावांहून शिक्षणासाठी येणार्या विद्यार्थिनींची संख्या मोठी असून बस स्थानक परिसरात रोडरोमिओंचा उपद्रव वाढला आहे. पाकीटमारांचे त्रास प्रवाशांना होत असल्याने सुरक्षेचा प्रश्न असल्याने येथील पोलीस चौकी तातडीने सुरू करण्याची मागणी तालुकाध्यक्ष माळवे व शहराध्यक्ष घोगरे यांनी करून कार्यवाही न झाल्यास पंधरा दिवसांनंतर मनसे स्टाइलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी दिला.
बस स्थानकातील खड्डे बुजवण्याबाबत, सुविधांबाबत तसेच येथील पोलीस चौकी तत्काळ सुरू करण्याबाबत पत्रव्यवहार करून समस्या लवकरात लवकर सोडण्यात येतील असे यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करताना आगार व्यवस्थापक धुमाळ यांनी सांगितले.