विरोधी पक्षनेते मंगेश खांडरे यांचे बेमुदत धरणे आंदोलन
शिरूर : शिरूर नगरपरिषदेच्यावतीने शहराला अशुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे.त्यामुळे अनेकांना आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागत आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार करून देखील दुर्लक्ष केले जात असल्याने शुध्द पाणी पुरवठा करण्याच्या व संबंधीतांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते मंगेश खांडरे यांनी आजपासुन नगरपरिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला.
शिरूर नगरपरिषदेच्यावतीने गेल्या अनेक दिवसांपासुन शहराला अशुध्द व पिवळसर रंगाच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असुन त्याबाबत विरोधी पक्षनेते मंगेश खांडरे यांनी वेळोवेळी प्रशासनास तक्रार केली असताना देखील अद्यापपर्यंत त्यात कोणतीही सुधारणा करण्यात आली नाही.अशुध्द पिण्याच्या पाण्यामुळे नागरीकांना पोटदुखी सारख्या अनेक आरोग्याच्या तक्रारी उदभवल्या आहेत.
ठेकेदार कर्मचार्यांवर कारवाईची मागणी
याबाबत दि.27 फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत सदर बाब सभागृहाच्या निदर्शनास आणुन दिली.मात्र त्यावर अद्यापपर्यंत कोणतीही ठोस उपाययोजना नगरपरिषदेकडुन करण्यात आलेली नसल्याने शहराला शुध्द पिण्या पाण्याचा पुरवठा करण्याच्या आणि सबंधीत ठेकेदार व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आजपासुन नगरपरिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलणास बसणार असल्याचे विरोधी पक्षनेते मंगेश खांडरे यांनी सांगितले.