विधानसभेकरीता सर्वच पक्षांतील मातब्बरांची रिंगणात उतरण्याची तयारी
आ. पाचर्णे यांच्या प्रयत्नांमुळे पूर्व हवेलीत भाजपचे वर्चस्व
राष्ट्रवादीतील उमेदवारीसाठी अशोक पवार, कंद प्रयत्नशील
काँग्रेसही उतरणार रिंगणात; इच्छुकांची चाचपणी सुरू
पुणे : विधानसभेची निवडणूक जशी जशी जवळ येऊ लागली तशतशी भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह अन्य पक्षांनी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू केल्या आहेत. परंतु, या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे सर्वच जण मातब्बर असून हे मैदान मारण्याकरिता सर्वांनीच कसरत सुरू केली आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे.
शिरुर-हवेली मतदार संघ पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, मागील निवडणुकीत या मतदारसंघात भाजपाचे आमदार बाबुराव पाचर्णे निवडून आल्यानंतर त्यांनी पूर्व हवेलीचा पट्टा भाजपमय करण्याचा मोठा यशस्वी प्रयत्न केला आहे. या मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार अशोक पवार, तसेच माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद जोरदार प्रयत्न करीत आहेत. तर भाजपाकडून पुन्हा आमदार बाबुराव पाचर्णे निवडणूक लढविण्यासाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे.
राजकारण्यांचे हवेलीतील दौरे वाढले
सध्या, या मातब्बरांनी शिरूर तालुक्यासह हवेली तालुक्यातील दौरे वाढविले आहेत. लोकसभेकरिता शिवसेनेचे आढळराव पाटील तयारी करीत असतानाच त्यांनी विधानसभेकरिता माऊली कटके यांच्याकरीता मैदान तयार करून ठेवण्याचीही तयारी केली आहे. तर, अशोक पवार, प्रदीप कंद यांच्याकरीता शरद पवार, अजित पवार यांच्या सभा महत्त्वाच्या ठरणार आहेत. भाजपचे आमदार बाबुराव पाचर्णे यांच्याकरिता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह पक्षातील मोठ्या नेत्यांनी तयारी सुरू केली आहे. शिरूरूमधून यावेळी विधानसभेकरीता काँग्रेसचाही उमेदवार रिंगणात असेल, असे जाहीर केले होते. त्यामुळे काँग्रेसकडूनही याबाबत चाचपणी सुरू आहे.
शिवसेनेकडून माऊली कटके?
विशेष म्हणजे यावेळी काँग्रेसही विधानसभेच्या रिंगणात उतरत असून जिल्हा परिषद सदस्य माऊली कटके यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार असल्याचे सांगितले जात असल्याने विधानसभेला शिरूर-हवेली मतदारसंघात चुरशीची लढाई पहायला मिळणार आहे. विधानसभेकरीता इच्छुक असलेली ही सर्व मंडळी अतिशय मातब्बर मानली जातात. या सर्वांचाच या मतदारसंघात हक्काचे मतदान असलेला भाग असल्याने कोणीही उमेदवार मुसंडी मारू शकतो. यामुळे गेल्यावेळी या मतदारसंघात जे चित्र होते. ते 2019 मध्येही असेल, असे सांगता येत नाही.
निवडणूक सोपी नाही
शिरूर-हवेलीतून विधानसभा लढण्याकरिता अनेक उमेदवार इच्छुक असले तरी येथील निवडणूक सोपी राहिलेली नाही. हवेली तालुक्यातील सर्वात कळीचा मुद्दा असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. याशिवाय पुणे-नगर महामार्गाचे रखडलेले काम यासह पुणे-सोलापूर मार्गावरील प्रश्न कायम आहेत. यामुळे आगामी निवडणुकीत या प्रश्नांना आखाड्यातील उमेदवारांना सामोरे जावे लागणार असल्याने ही निवडणूक सोपी नसल्याचे म्हटले जात आहे.