पुणे । तुळजापूर येथील राजे शहाजी प्रवेशद्वाराची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ-शहाजी शिवज्योत रथ… एकापाठोपाठ येणारे सरदारांचे, मावळ्यांचे, वीर मातांचे स्फुर्ती देणारे 65 स्वराज्यरथ… महाराणी ताराराणी शौर्य पथकातील 51 रणरागिणींच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक मानवंदना… 51 रणशिगांची ललकारी… शिवगर्जना ढोलताशा पथकांचा रणगजर… सनई-चौघड्यांचे मंगलमय सूर… हजारोंच्या संख्येने पारंपरिक पोशाखात उपस्थित महिला… आणि शिवभक्तांनी केलेला ‘जय शिवाजी जय भवानी’चा जयघोष अशा वातावरणात शिवकाल पुन:श्च एकदा पुण्यामध्ये अवतरला.
निमित्त होते; शिवजयंती महोत्सव समितीतर्फे लालमहाल येथून आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा या मिरवणुकीचे! महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, तंजावरचे युवराज महाराज संभाजीराजे, आमदार शशिकांत शिंदे, हर्षवर्धन पाटील, डॉ.डी.वाय. पाटील, अॅड. सिद्धार्थ धेंडे, प्रदीप रावत, अमित गायकवाड, नामदेव शिरगांवकर, दिलीप मोहिते, श्रीनाथ भिमाले, दीपक मानकर, अरविंद शिंदे, भानुप्रताप बर्गे, सुनील मारणे यांच्या हस्ते लालमहालातील जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार घालून जिजाऊ-शहाजी रथावरील शिवज्योत प्रज्ज्वलन करीत मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, अॅड. प्रताप परदेशी, पराग मते, प्रवीण परदेशी आदी उपस्थित होते. मिरवणुकीचे यंदा 6 वे वर्ष आहे.
शिवकालीन युद्धकला 51 रणरागिनींकडून सादर
महाराणा प्रताप, श्री शिवछत्रपती, छत्रसाल बुंदेले यांच्या मूर्ती असलेला छत्रपती छत्रसाल बुंदेले महाराज स्वराज्यरथ दिमाखात सोहळ्यात मिरवत होता. भारताच्या इतिहासातील शिवकालीन युद्धकला सादर करणार्या 51 रणरागिनींच्या औरंगासुर मर्दिनी भद्रकाली रणरागिनी महाराणी ताराराणी शौर्य पथक मर्दानी युद्धकला सादर केली. शिवगर्जना ढोलताशा पथकाच्या जल्लोषपुर्ण वादनाने वातावरण मंत्रमुग्ध झाले. सोहळ्याचे आयोजन अमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ललित शिंदे, दीपक घुले, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, गिरीष गायकवाड, दिग्विजय जेधे, शंकर कडू, महेश मालुसरे, निलेश जेधे, गोपी पवार, अनिल पवार, समीर जाधवराव, दीपक बांदल, किरण देसाई, मंदार मते, मयुरेश दळवी यांनी केले.
जिजाऊ-शहाजी शिवज्योत रथ
मिरवणुकीत जिजाऊ-शहाजी शिवज्योत रथाच्या नेतृत्वाखाली सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनौबत सेनापती येसाजी कंक, सरदार नरवीर तानाजी मालुसरे, मानाजी पायगुडे, कान्होजी कोंडे, वीर बाजीप्रभु देशपांडे यांच्यासह 65 सरदार घराण्यांचे स्वराज्यरथ मिरवणुकीत सहभागी झाले होते.
एसएसपीएमएस शाळेतील श्री शिवछत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळयावर महापौर मुक्ता टिळक, आमदार शशीकांत शिंदे, ईशान गायकवाड यांच्या हस्ते हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. पुष्पवृष्टीचे यंदा 7 वे वर्ष आहे.