शिवनेरीवर मुंडे, तावडेंना रोखले!

0

शिवभक्तांकडून भाजपविरोधी घोषणा

जुन्नर : छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडावर कार्यक्रमासाठी आलेल्या संतप्त शिवभक्तांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना रोखले. तसेच भाजप सरकार हाय हायच्या घोषणाही दिल्या. गडाकडे निघालेल्या शिवभक्तांना सकाळी पोलिसांनी रोखल्याने व्हीआयपी संस्कृतीवर संतापलेल्या शिवभक्तांनी घोषणा देऊन आपला राग व्यक्त केला. प्रवेशपास असलेल्या शिवप्रेमींनाच गडावर सोडण्यात येत असल्याने हजारो शिवभक्तांना गडाच्या पायथ्यावरूनच माघारी जावे लागत होते. त्यामुळे शिवभक्तांना राग अनावरण झाल्याने त्यांनी दोन्ही मंत्र्यांना रोखले.

मुख्यमंत्री न थांबल्यानेही रोष
दरवर्षी शिवनेरीवर शिवजयंती झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे भाषण होत असते. यंदा मुख्यमंत्र्यांनी भाषण केलेच नाही. मुख्यमंत्र्यांनी फक्त पाळणा जोजवला आणि निघून गेले. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली. नियोजित कार्यक्रमानुसार मुख्यमंत्र्यांचे 8.55 वाजता किल्ल्यावर आगमन होणार होते आणि 10.05 वाजता ते परत जाणार होते. मात्र 9.35 वाजताच मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरने शिवनेरीवरुन उड्डाण घेतले. यामुळे शिवनेरी किल्यावरुन उतरतानाही विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांना शिवप्रेमींच्या रोषाला तोंड द्यावे लागले. विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, मुंबईतील मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमामुळे मुख्यमंत्र्यांना जास्त वेळ शिवनेरीवर थांबता आले नाही.

दोन्ही मंत्र्यांनी काढता पाय घेतला
विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांना रोखण्याचा शिवप्रेमींनी प्रयत्न केला. तसेच सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त याठिकाणी होता. पंकजा मुंडे यांनी शिवप्रेमींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, गोंधळ वाढत गेल्याने विनोद तावडे यांनी काढता पाय घेतला. ते पाहून पंकजा मुंडेही निघून गेल्या. मंत्र्यांनी काढता पाय घेतल्याचे लक्षात येताच शिवप्रेमींचा संताप आणखी वाढला. त्यांनी सरकारविरोधातही जोरदार घोषणाबाजी केली.