भुसावळ- तालुक्यातील शिवपूर-कन्हाळे येथील रिक्षा चालकाने भुसावळ शहरातील तालुका बीज केंद्रामागील मोकळ्या जागेत लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. रेवसिंग गोपाळ पाटील (30) असे मृत रिक्षा चालकाचे नाव आहे. भीमसिंग माधव पाटील यांनी याबाबत शहर पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रशीद तडवी करीत आहेत. दरम्यान, मयत चालकाने कर्जाने घेतलेल्या अॅपे रीक्षाचे हप्ते थकल्याने ती संबंधित कंपनीच्या वसुली अधिकार्यांनी बुधवारी उचलून नेली होती व त्यातून आलेल्या वैफल्यग्रस्ततेमुळे रेवसिंग पाटील यांनी आत्महत्या केली असावी, अशी चर्चा ऐकायला मिळाली मात्र याबाबत पोलीस सूत्रांकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. दरम्यान, मयताच्या पश्चात आई, वडील, दोन मुले, मुलगी, बहिण असा परीवार आहे. गुरुवारी दुपारी शोकाकुल वातावरणात मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.