शिवपूर-कन्हाळे दंगलीतील आरोपींना न्यायालयीन कोठडी

0

भुसावळ– तालुक्यातील शिवपूर-कन्हाळे येथे दोन समाजाच्या गटात झालेल्या दंगलीप्रकरणी दोन्ही गटाच्या 25 आरोपींविरुद्ध तालुका पोलिसात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात येऊन सर्व आरोपींना अटक करण्यात आली होती. आरोपींना सोमवारी भुसावळच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. गत आठवड्यातील मंगळवारी जळगाव तालुक्यातील खेडीच्या वर्‍हाडात झालेल्या वाद मिटवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्याचे वाईट वाटून जमावाने तीन रीक्षांसहचे नुकसान करीत दुचाकी पेटवली होती तर या प्रकारानंतर दोन्ही गटाने एकमेकाविरुद्ध फिर्याद दिल्याने दंगलीचा गुन्हा दाखल होता. सुरुवातीला एका गटातील चार तर दुसर्‍या गटातील एका आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर दोन्ही गटातील 20 आरोपी पोलिसांना शरण आले होते. त्यांना न्यायालयाने 26 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीदरम्यान आरोपींनी गुन्ह्यासाठी वापरलेली लोखंडी टॉमी तसेच काठी, रक्ताने भरलेले कपडे जप्त करण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले.