भुसावळ– तालुक्यातील शिवपूर-कन्हाळे येथे दोन समाजाच्या गटात झालेल्या दंगलीप्रकरणी दुसर्या गटातर्फे गुरुवारी रात्री उशिरा 12 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला तर या प्रकरणी संशयीत आरोपी मोहम्मद गवळी यास अटक करण्यात आली. मनोज भोळे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून संशयीत आरोपी मोहम्मद गवळीसह जावेद गवळी, मासुम गवळी, हुसेन कारभारी, रमजान गवळी, युसूफ गवळी, हसन गवळी, जमील गवळी, मोहम्मद नथ्थू गवळी, उस्मान गवळी, अजीज गवळी, चाँद जुम्मा गवळी यांच्याविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गावात तणावपूर्ण शांतता ; बंदोबस्त कायम
मंगळवारी जळगाव तालुक्यातील खेडी येथील वर्हाड आल्यानंतर झालेल्या वादावादीनंतर दोन गट समोरा-समोर भिडल्याने दंगल उसळून तीन रीक्षांसह एका दुचाकीचे नुकसान झाले होते. किरकोळ भांडणाने दंगल झाल्याचे बोलले जात असलेतरी या वादाला मात्र जुन्या भानगडींची खुमखुमी असल्याचे सांगितले जाते. पहिल्या गटातील 14 जणांविरुद्ध मोहम्मद गवळी यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल होवून चार आरोपींना पोलिसांनी अटक केली होती तर अन्य पसार झालेल्या संशयीतांविरुद्ध पोलिसांनी धरपकड सत्र सुरू केले आहे. अटकेतील चौघा आरोपींना न्यायालयाने 25 फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक आर.एन.होळकर व उपनिरीक्षक सचिन खामगड परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.