शिवपूर कन्हाळ्यात गावठी दारूचे एक हजार आठशे लीटर रसायन उद्ध्वस्त

0

भुसावळ- तालुक्यातील शिवपूर कन्हाळा येथील नाल्याकाठी गावठी दारू बनवली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून तालुका पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 58 हजार 200 रुपये किंमतीचे एक हजार 800 लिटर गावठी दारूचे रसायन नष्ट करण्यात आले. रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास झालेल्या या कारवाईनंतर आरोपी गफूर बुधा गवळी (55) पसार झाला असून त्याच्याविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शिवपूर कन्हाळा गावाच्या नाल्याकाठी असलेले पत्र्याचे शेडमध्ये गुळमिश्रीत व नऊ ड्रममधील गरम रसायन मिळून एक हजार 800 लिटर रसायन तसेच 70 लिटर गावठी दारू नष्ट करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप पाटील, गजानन करेवार, हवालदार रीयाज शेख, राजेंद्र पवार, प्रेमचंद सपकाळे, कमलाकर बागुल, मोनी पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.