शिवबाच्या खिंडीत अफझलखान!

0

देशाच्या सत्तेची पायरी चढताच ज्या अमित शहांनी शिवसेनेचा आणि उद्धव ठाकरेंचा नेहमीच अपमान केला, भेटी नाकारल्या त्याच शहांनी हात जोडून मातोश्रीची पायरी चढत उद्धव ठाकरेंसमोर आता नांगी टाकली आहे. भाजपने लोकसभेसाठी युती केली. मात्र, देशात भाजप बहुमताने निवडून येताच विधानसभेला युती तोडून शिवसेनेला खिंडीत गाठले. त्यावेळी नरेंद्र मोदी, अमित शहा विरुद्ध उद्धव ठाकरे असा थेट सामना रंगला. एकमेकांचा बाप काढण्यापासून अफजलखानापर्यंतच्या उपमा देण्यात आल्या. या दोन्ही पक्षांतील जे आपुलकीचे नाते होते ते आता राहिले नाही. एकमेकांवर फैरी झाडण्यातच चार वर्षे खर्ची पडली. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदाही स्वबळावर लढल्या गेल्या. शिवसेनेची जिरवण्यासाठी प्रसंगी कडव्या विरोधकांच्या हातात हातही दिला गेला.

बाळासाहेब ठाकरेंच्या काळात परिस्थिती वेगळी होती. कमळाबाईच्या नाकात नथ घालून त्याची दोरी वाघाच्या हातात दिल्याची व्यंगचित्रे तेव्हा गाजली होती. बाळासाहेब थेट आणि ठाकरी शैलीत भाजपची घाण काढायचे. ते भाजपवर अनेकदा रागावले, पण दिवंगत नेते प्रमोद महाजन हे नेहमीच तुटलेला धागा जोडायचे. वाजपेयी आणि अडवाणी या दोघांनीही बाळासाहेबांना नेहमीच स्नेह दिला. हे सगळे चित्र बदलत गेले ते बाळासाहेबांच्या निधनानंतर, म्हणजे मोदी-शहांच्या पर्वाला सुरुवात झाली तेव्हा. 2014च्या निवडणुकांनंतर तर युतीतल्या या मोठ्या भावाला भाजपने छोटा भाऊ बनवून टाकले. भाजपचे चिल्लर नेतेही या काळात सेनेवर दगड मारू लागले. त्या जखमा अजूनही ओल्या आहेत. शहांनी बंद दाराआड बसून उद्धव ठाकरे यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. स्वतः उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेना स्वबळावरच लढणार असल्याचा मुद्दा या बैठकीनंतर उद्धृत केला आहे. उद्धव ठाकरेंनी ही भेट भन्नाट गाजवली. ही भेट पूर्णपणे उद्धव यांच्या अटीनुसार झाली. या भेटीच्या दिवशी सकाळी सामनाच्या अग्रलेखात भाजपवर खरपूस टीका केली. शिवसेना स्वबळावर लढणार याचा पुनरुच्चार केला, ऑन कॅमेराही राऊत यांनी ते स्पष्ट केले. मात्र, तरी त्यावर एक चकार शब्द काढण्याची भाजपची हिंमत झाली नाही. त्याला कारणही तसेच आहे. देशात झालेल्या ताज्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला चांगलीच चपराक लागली आहे. त्यामुळेच या भेटीची जास्त गरज भाजपलाच होती. पालघरची लोकसभेची जागा जिंकताना शिवसेनेने भाजपच्या तोंडाला फेस आणला.

या मतदारसंघात 25 वर्षांत पहिल्यांदाच निवडणूक लढवणार्‍या शिवसेनेने तोंडात बोट घालायला लावण्याइतपत मतदान घेतले आहे. इतर पोटनिवडणुकांतही नरेंद्र मोदींची आणि भाजपची ढासळती लोकप्रियता स्पष्ट झाली. लोकसभेच्या 4 जागांपैकी 3 आणि विधानसभेतल्या 11 पैकी फक्त 10 जागांवर भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. नागालँडची लोकसभेची जागा भाजपच्या मित्रपक्षाने जिंकली असली, तरी तो पक्ष एनडीएमध्ये राहील का, याची खात्री कुणीही देऊ शकणार नाही. या झटक्यांमुळेच अफझलखान जागा झाला, असे शिवसेनेने म्हटले आहे. मित्रपक्षांना नाराज ठेवून आपण 2019ची लोकसभा निवडणूक लढू शकत नाही, हे त्यांनी जाणले आणि भारतभर मित्रपक्षांच्या भेटीगाठी सुरू केल्या. चंद्राबाबू नायडूंच्या पक्षातील मंत्र्यांनीही भाजपच्या थोबाडावर आपले राजीनामे भिरकावले आहेत. त्यामुळे हळूहळू भाजपच्या सिंहांची कोंडी होऊ लागली आहे. याच परिस्थितीचा फायदा उद्धव ठाकरेंनी उठवला आहे. चार वर्षांनंतर पहिल्यांदाच वाघाने पुन्हा डरकाळी फोडली आहे! भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना उद्धव ठाकरेंनी मातोश्रीच्या आसपासही फिरकू दिले नाही. अमित शहांसोबत फक्त मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस येऊ शकले. पण प्रत्यक्ष चर्चेच्या वेळी मुख्यमंत्र्यांनाही खूप वेळ बाहेर बसवण्यात आले. जेव्हा त्यांना चर्चेत सामावून घेतले तेव्हा त्यांच्यासोबत आदित्य ठाकरेंनाही बसवण्यात आले आणि त्यांची जागा त्यांना दाखवून देण्यात आली. हा अपमान गिळताना नक्कीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी आवंढा गिळला असेल. चार वर्षांतल्या अपमानाची परतफेड उद्धव ठाकरेंनी व्याजासहित केली हे नक्की. आपण मनात आणले तर आपण काय करू शकतो, हे शहांना आणि भाजपनेत्यांना त्यांनी दाखवून दिले. अर्थात गरजवंताला अक्कल नसते, असे म्हणतात म्हणूनच भाजपने सध्या मूग गिळून गप्प बसणे पसंत केले आहे.

अमित शहा उद्धवना आणखी दोन-तीनदा भेटतील, असे भाजप नेते सांगत आहेत. यावरून उद्धव यांचा मूड स्पष्ट होतो. ते भाजपच्या कोणत्याही गाजराला सहजासहजी भीक घालतील, अशी शक्यता नाही. सध्या शिवसेनेची अवस्था चारो उंगली घी मे, और सर कढाई मे, अशी आहे. शिवसेनेला एका बाजूने शरद पवार चुचकारत आहेत, तर दुसरीकडे भाजप त्यांची मनधरणी करतो आहे. स्वबळावर पुढच्या निवडणुका लढवण्याची आपली घोषणा अजून शिवसेनेने मागे घेतलेली नाही. हुकमाचे सारे पत्ते हातात ठेवून शिवसेना चालत आहे.

अर्थात, हे पत्ते टाकण्यापूर्वी उद्धवना पक्षांतर्गत परिस्थितीचा विचार करावा लागेल. भाजपबरोबर पुन्हा समझोता करावा की नाही, याविषयी शिवसेनेत एकमत नाही. सरकारमध्ये असलेले सेना नेते आणि खासदारांच्या एका मोठा गटाचा भाजपशी समझोता करावा, असा आग्रह आहे. पण सेनेचे स्थानिक नेते आणि शिवसैनिकांची मात्र स्वबळावर लढण्याची इच्छा आहे. गेली चार वर्षे शिवसेना डबल रोल खेळते आहे. सरकारमधल्या सहभागापुरते ते सत्ताधारी आहेत, प्रत्यक्ष मैदानात मात्र ते विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहेत. भाजपचे नेते स्थानिक पातळीवर आमचे खच्चीकरण करतात ही शिवसैनिकांची तक्रार आहे. अमित शहा यांच्या भेटीपूर्वी काही वेळ, रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांची वृत्तवाहिन्यांवर जी तूतू-मैमै झाली, ती शिवसैनिकांच्या याच भावनेचे प्रतिबिंब आहे. उद्धव ठाकरेंना युतीविषयी निर्णय घेताना हा तोल सांभाळावा लागेल.पालघरच्या पोटनिवडणुकीच्या वेळी एक प्रस्ताव आला होता. जसे पलूस-कडेगावमध्ये सर्व पक्षांनी पतंगराव कदम यांच्याविषयी आदर म्हणून विश्‍वजित कदमांना पाठिंबा दिला तसाच पालघरमध्ये चिंतामण वनगांच्या मुलाला काँग्रेसने द्यावा, असा सेनेचा आग्रह होता. पण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ती संधी गमावली. खरे तर चव्हाणांनी तेथे थोडा प्रगल्भपणा दाखवला असता, तर भाजपची पुरती अब्रू गेली असती आणि विरोधी पक्षात चैतन्य निर्माण करण्यासाठी त्याचा फायदा झाला असता.

खरे तर भाजप हा संधीसाधूचा पक्ष आहे. जर भाजपला कर्नाटकात सत्ता स्थापन करता आली असती, तर शिवसेनेला त्यांनी इतके महत्त्व भाजपने दिले असते का? कर्नाटक जिंकले असते तर भाजपने विजयाचे ढोल भारतभर बडवले असते. एनडीएतील जे काही महत्त्वाचे घटक पक्ष आहेत ते भाजपवर नाराज आहेत. त्यांच्या नाराजीचा फटका भाजपला बसू शकतो. टीडीपी, शिवसेना, अकाली दल हे प्रादेशिक पातळीवर वजनदार पक्ष आहेत. त्यांनी ठरवले तर भाजपला चांगलाच धडा मिळेल याची अक्कल आता भाजपला आली आहे.लोकसभा निवडणुकीला अजून दहा महिने बाकी आहेत. त्याआधी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुका होतील. त्यात भाजपचा पराभव झाला, तर मोदी-शहा यांची अवस्था अधिकच केविलवाणी होईल. शिवसेनेचे वजन आणखीन वाढेल. उद्धव ठाकरेंसाठी तो चांगलाच मोका असेल. तेव्हा भाजपची पारध करणे शिवसेनेला आणखीनच सोपे जाईन. शिवसेना स्वतंत्र लढली तर त्यांचे नुकसान होईल याचे भान उद्धव ठाकरेंना नक्कीच आहे. शिवसेना आणि भाजपने 2014ची निवडणूक या दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे लढली, तेव्हा त्यांना 42 जागा मिळाल्या होत्या. 43वी जागा युतीतल्या राजू शेट्टी यांची होती. ते अगोदरच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले आहेत. भाजपचे 24 आणि सेनेचे 18 खासदार यात आहेत. शिवसेना आणि भाजपने स्वतंत्रपणे निवडणुका लढल्यास आणि मोदी लाट ओसरली, तर यातल्या अर्ध्या जागाही जिंकणे शक्य नाही. याचा थेट फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळेल. याचा फटका बसल्याने जीतके नुकसान शिवसेनेचे होईल त्यापेक्षा भाजपला बरेच काही गमवावे लागणार आहे. हे उमगल्यानेच अमित शहा यांनी मातोश्रीवर लोटांगण घातले आहे. अमित शहांनी शिवसेनेला गोंजारले असले, तरी तातडीने भाजपच्या गळ्यात लगेच हात टाकेल, असे नाही. पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. शिवसेना कोणत्याही परिस्थितीत स्वबळावर लढेल, असे सांगताना ते म्हणाले, स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेच्या कार्यकारिणीने घेतला आहे. हा निर्णय दुसरा पक्ष बदलू शकत नाही. त्यामुळे अजून बैठकांच्या खूप फेर्‍या होतील. शिवसेनेने हे युद्ध जवळपास जिंकले आहे. मात्र, त्यांची खरी कसोटी तहात आहे. मग कळेल शेंडी तुटली की पारंबी.

शेंडी तुटणार की पारंबी…
मित्रपक्षांना नाराज ठेवून आपण 2019ची लोकसभा निवडणूक लढू शकत नाही, हे भाजपने जाणले आणि भारतभर मित्रपक्षांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. शिवसेना आणि भाजपने स्वतंत्रपणे निवडणुका लढल्यास आणि मोदी लाट ओसरली तर यातल्या अर्ध्या जागाही जिंकणे शक्य नाही. याचा थेट फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळेल. याचा फटका बसल्याने जितके नुकसान शिवसेनेचे होईल त्यापेक्षा भाजपला बरेच काही गमवावे लागणार आहे. हे उमगल्यानेच अमित शहा यांनी मातोश्रीवर लोटांगण घातले आहे. अजून बैठकांच्या खूप फेर्‍या होतील. शिवसेनेने हे युद्ध जवळपास जिंकले आहे. मात्र, त्यांची खरी कसोटी तहात आहे. मग कळेल शेंडी तुटली की पारंबी.

– राजा आदाटे
वृत्तसंपादक जनशक्ति, मुंबई