शिवरायांच्या चरीत्रातून जिजाऊंच्या संस्कारांचे दर्शन

v

भुसावळ : स्वराज्य घडविण्यासाठी आपल्या संसाराची राखरांगोळी करून सुखाचा त्याग करत खंबीर होऊन कर्तृत्व घडविणार्‍या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जी शिकवण व संस्कार दिले, त्याचे दर्शन छत्रपती शिवरायांच्या चरीत्रातून आपल्याला वेळोवेळी घडते. चंद्रकोरच्या रूपाने आपल्या आईला आयुष्यभर कपाळावर मिरवणारे छत्रपती शिवाजी महाराज जगभरात अद्वितीय आहेत, असे प्रतिपादन शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे (जळगाव) यांनी केले.

तर राजमाता जिजाऊ समजून घ्याव्या लागतील
भुसावळ येथील छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे शिवजयंतीनिमित्त आयोजित शिवदर्शन सप्ताहात ‘राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ समजून घेताना’ या विषयावर भदाणे बोलत होते. शिवदर्शन सप्ताहाची संकल्पना डॉ.जगदीश पाटील यांची आहे. शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे यांचा परीचय प्रा.निलेश गोरे यांनी करून दिला. भदाणे आपल्या व्याख्यानात म्हणाले की, छत्रपती शिवराय समजून घेण्याआधी राजमाता जिजाऊ समजून घ्याव्या लागतील. शिवबा अकरा वर्षाचे होईपर्यंत सुमारे चार हजार किलोमीटरचा प्रवास तेजस्वी व प्रभावी व्यक्तिमत्त्व असणार्‍या राजमाता जिजाऊ यांनी घडवून आणला. जेणेकरून कोणासोबत लढायचे आहे आणि स्वराज्य कसे घडवायचे आहे याचे दर्शन शिवबांना होईल. स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवताना राजमाता जिजाऊंनी शिवरायांच्या हाती नांगर दिला. क्रांती घडविण्याआधी मन, मेंदू व मनगट बळकट करण्याची शिकवण दिली. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांची शोधमोहीम थांबवावी यासाठी राजमाता जिजाऊ यांनी आपल्या जिवंत नातवाचे तर छत्रपती शिवरायांनी आपल्या जिवंत मुलाचे श्राद्ध घातले. शिवराय स्वराज्यात नसताना राजमाता जिजाऊ यांनी सैनिकाचा वेश परिधान करून रांगणा किल्ला जिंकला.

विज्ञानवादी विचार रूजविण्याचे काम राजमातांनी केले
डोळ्यात तेल घालून जे स्वप्न पाहिले ते छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाल्यावर पूर्ण झाल्याचे समाधान राजमाता जिजाऊंना लाभले. त्यांच्या जीवनाचा हा यशस्वी गाथा होय. राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी पाचाडला त्यांनी या इहलोकांवर डोळे मिटले. आयुष्यभर शिवरायांचे मार्गदर्शक तसेच मृत्युनंतरही त्यांच्यासाठी तजवीज करून त्या मार्गदर्शक ठरल्या. खर्‍या अर्थाने राजमाता जिजाऊ ह्याच शिवरायांच्या गुरू होत. अमावस्येच्या रात्री स्वराज्याचा पहिला तोरणा किल्ला जिंकायला पाठवून शेकडो वर्षापूर्वी विज्ञानवादी विचार रूजविण्याचे काम राजमाता जिजाऊ यांनी केले असल्याचेही रामेश्वर भदाणे यांनी सांगितले. सूत्रसंचालन अरुणा उदावंत यांनी तर आभार अमोल दांदळे यांनी मानले.