मुंबई । छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. शेतकर्यांना, मावळ्यांना शिवाजी महाराजांनी प्रेरित केले. त्यांचा पराक्रम अलौकिक होताच, त्याचबरोबर शिवरायांनी सुशासन आणि प्रशासनाची मुहूर्तमेढ रोवली असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आज त्यांच्या हस्ते शिवस्मारकाच्या भूमिपूजन आणि जलपूजनाच्या कार्यक्रमांबरोबरच एकूण 1 लाख कोटी रुपयांच्या मेट्रो आणि नागरी रेल्वेच्या विविध योजनांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या एमएमआरडीए मैदानावर भव्य सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. पंतप्रधानांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवरायांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे भोसले, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकया नायडू, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री सुभाष देसाई, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, राज्यमंत्री रणजित पाटील, राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे उपस्थित होते.
मोदींनी केली मराठीतून भाषणाला सुुरुवात
‘शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करुन मी भाषणाला सुरुवात करतो’, असे मराठीमध्ये म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांची मने जिंकली. 2014 च्या निवडणुकीला सुरुवात करण्यापूर्वी मी रायगडवर आलो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले. ज्याप्रमाणे त्यांनी सुशासन आणि प्रशासन या दोन्ही बाजू अनेक संघर्षमय स्थितीमध्ये समर्थपणे पेलल्या त्याप्रमाणे मला करता यावे अशी मी प्रार्थना केल्याचे पंतप्रधानांनी यावेळी बोलताना सांगितले. आजपर्यंत आपण इतिहासकार आणि चित्रकारांच्या नजरेतून शिवरायांची जी प्रतिमा आपल्या मनात साकार केली, ती एक योद्धा म्हणून होती. पण शिवरायांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. त्यांनी संघटन कौशल्याचा जो आदर्श घालून दिला, तो सर्वांना सदैव प्रेरणादायी आहे. तसेच त्यांनी व्यवस्थापनाचे जे धडे दिले, ते आजच्या इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनाही उपयोगाचे आहेत. सागरी सीमांच्या रक्षणासंदर्भात शिवरायांनी नौदलासमोर आदर्श वस्तूपाठ जनतेला घालून दिला असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.
नोटाबंदीचे समर्थन
देशातील भ्रष्टाचार आणि काळा पैसा संपवण्यासाठी 8 नोव्हेंबर रोजी एक मोठी लढाई सुरू केली असल्याचे सांगत, ही लढाई जोपर्यंत जिंकणार नाही, तोपर्यंत थांबणार नाही, अशी घोषणा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैशांविरुद्ध कार्यवाही सुरूच राहणार असल्याचे संकेत दिले. जनतेने 50 दिवस त्रास सोसला आहे. आणखी त्रास सोसण्यास जनता तयार असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले. जे अप्रामाणिकपणे पैसे कमावत आहेत, त्यांचे जगणे मुश्किल होईल. त्यांनी वेळीच सावध व्हावे, असा इशाराही पंतप्रधानांनी यावेळी दिला. भाजप सरकारने अनेक निर्णय घेतले, परंतु नोटाबंदीचा हा निर्णय सर्वात मोठा होता. त्या निर्णयाचे समर्थन सर्व जनतेने केले. ही जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे असे पंतप्रधानांनी म्हटले.
ठेवा जनत करण्यात असमर्थ ठरलो
राज्यातील गडकोट किल्ल्यांसदर्भातही बोलताना पंतप्रधान म्हणाले की, आजही पर्यटनाचा विषय येतो, तेव्हा ताजमहालचे सौंदर्य अनेक पर्यटकांना आकर्षित करते. पण देशातील अनेक राजे-महाराजांनी आपले राजवाडे, गडकोट किल्ल्यांच्या माध्यमातून जो ठेवा आपल्याला दिला, त्याचे जतन करण्यात आपण असमर्थ ठरलो आहोत. पण मी पुरातत्व खात्याला सांगून यामधूनही काही मार्ग काढून देशातील सर्व गडकोट किल्लेही पर्यटन क्षेत्रे होतील काय, याकडे लक्ष देणार आहे, अशी ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली.
मुंबईसाठी 55,000 हजार कोटींची गुंतवणूक – रेल्वे मंत्री सुरेश प्रभू
मुंबईसाठी 55,000 हजार कोटींची गुंतवणूक रेल्वेसाठी करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केली. राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नांतून 22,000 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात रेल्वे क्षेत्रात करण्यात येणार असल्याचे प्रभू यांनी सांगितले.
गड-किल्ले राज्याच्या ताब्यात द्या – उद्धव ठाकरे
दिल्लीच्या पुरातत्व खात्याच्या वेढ्यात असणारे शिवरायांचे गड-किल्ले मुक्त करून राज्य सरकारच्या ताब्यात द्यावे, राज्य सरकार या किल्ल्यांची निगा राखेल, अशी विनंती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. आपण आज छत्रपतींना वंदन करण्यासाठी आले असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी शिवस्मारक महाराष्ट्रालाच नाही तर जगाला प्रेरणा देणारे व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
शिवा होण्याची योग्यता नाही जिवा होण्याची संधी द्या – मुख्यमंत्री
छत्रपती शिवरायांनी याच दिवशी सिंधूदुर्ग किल्ल्याचे जलपूजन केले असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवस्मारकाच्या जलपूजनाने आपण भारावून गेलो असल्याचे सांगितले. आपण छत्रपतींचे सेवक असून शिवा होण्याची योग्यता नाही, पण जिवा होण्याची संधी द्या, अशी भावनिक सादही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना घातली. येणार्या पाच वर्षांमध्ये मुंबई शहराच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत जाण्यासाठी आम्ही मेट्रोच्या माध्यमातून एंड टू एंड सोल्यूशन देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबई ते कल्याण थेट मेट्रोने जाता येणार असल्याचे स्पष्ट करताना मुख्यमंत्र्यांनी 200 किमीचा मेट्रो प्रकल्प उभारणार असल्याची घोषणाही यावेळी केली.
पंतप्रधानांच्या हस्ते 6 प्रकल्पांचे भूमीपूजन
1) मेट्रो 2 बी – डीएन नगर-वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स-मानखुर्द
2) मेट्रो 4 – वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली
3) मुंबई ट्रान्स हार्बर लिंक
4) कुर्ला-वाकोला उन्नत रोड
5) कलानंगर जंक्शन उड्डाणपूल
6) एमयूटीपी-3