पारोळा- तालुक्यातील शिवरे येथील जंगलात शनिवारी आढळलेल्या बिबट्याचा अन्नातून विषबाधा झाल्याने मृत्यू झाल्याचा संशय असून वनविभागाने व्हिसेरा प्रिझर्व्ह ठेवत बिबट्यावर जागेवरच अंत्यसंस्कार केले. शनिवारी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान गुरांना चारताना एका गुरख्याला 336 कंपार्टमेंट या राखीव वन विभागात एक बिबट्या मृतावस्थेत आढळल्यानंतर वनपाल कविता पाटील यांना ही माहिती दिली होती तर चाळीसगाव वन क्षेत्रपाल संजय मोरे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यासह राजेश ठोंबरे, वनपाल ए.बी.आहिरे, कविता पाटील, राहुल पाटील, मंदा मोरे, राहुल मांडके, मनोहर पाटील, अशोक पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान, मृत बिबट्याच्या तोंडातून फेस बाहेर पडत असल्याचे व चार वर्षांचा नर जातीचा असल्याचे व शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा नसल्याने त्यास विषबाधा झाली असल्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे. बिबट्याच्या मृतदेहाशेजारी उलटी केल्याचे व्रण असून व्हिसेरा नाशिक येथे पाठवण्यात आला आहे.