शिवसृष्टीबाबत भाजपने खुलासा करावा

0

पुणे । चांदणी चौकातील जैवविविधता (बीडीपी) प्रकल्पातील 50 एकर जागा शिवसृष्टीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील घेतल्यानंतर महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांनी पालिकेच्या आवारातच आंदोत्सव साजरा केला. तर शिवसृष्टीबाबत राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकर यांनी 11 फेब्रुवारीपर्यंत निर्णय न घेतल्यास आंदोलन करून मेट्रोचे काम बंद पाडण्याचा इशारा दिला होता. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर शहरात याचे राजकीय श्रेय घेण्यावरून चढाओढ सुरू झाली. या पार्श्‍वभूमीवर मनसेचे कोथरूड विभाग अध्यक्ष सुधीर धावडे यांनी शिवसृष्टीचा प्रकल्प रखडू नये यासाठी काही खुलासे करण्याची मागणी पत्रकाद्वारे केली आहे.

शिवसृष्टी हा प्रकल्प खरंच भाजपला पूर्ण करायचा आहे का? असल्यास भाजपचा स्थानिक नगरसेवक प्रकल्पास विरोध कसा करतो? तसेच शिवसृष्टीचे 50 एकरचे क्षेत्र प्रत्यक्षात सर्वसीमा (सर्वे नंबरसह) जाहीर करण्यात यावे. या प्रकल्पासाठी संबंधित जागा मालकांना मोबदला कशा प्रकारे देणार, जागामालकांना मोबदला राज्य सरकार किंवा महापालिका कशा प्रकारे देणार तसेच क्षेत्रामध्ये अनधिकृत बांधकामे असल्यास त्यावर काय कारवाई कशी करणार, याबरोबरच या क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या गृहप्रकल्पावर व बांधकामावर तसेच खोदकामांवर त्वरित कारवाई करण्यात यावी.

चांदणी चौक परिसरात जो बहुमजली उड्डाणपूल व मेट्रो प्रकल्प योजिला आहे. आता त्यामध्ये शिवसृष्टीच्यादृष्टीने योग्य ते बदल करण्यात यावेत अशी मागणी धावडे यांनी केली आहे. शिवसृष्टी प्रकल्प हा प्रत्येक शिवप्रेमींच्या आत्मीयतेचा विषय असून तो होत असताना कुठलाही हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी असे पत्रकात नमूद केले आहे.