शिवसेनाप्रमुखांच्या संकल्पित स्मारकाचा मार्ग मोकळा

0

मुंबई । शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक सर्वांना प्रेरणा मिळेल, असे उभारण्यासाठी नगरविकास विभागाने सविस्तर आराखडा तयार करावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पित स्मारकाचा मार्ग मोकळा झाला आहे. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंबंधी योजनेचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

महापौर बंगल्याच्या ठिकाणी होणार स्मारक
उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सुमीत मल्लिक, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, प्रधान सचिव मनीषा म्हैसकर आदी या बैठकीस उपस्थित होते. महापौर बंगला येथे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार असून या स्मारकाची माहिती देणारे सादरीकरण यावेळी करण्यात आले. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा आराखडा तयार करताना त्यात येथे येणार्‍या अनुयायांची संख्या, त्यांना पुरवावयाच्या सोयी-सुविधा, वाहनतळ आदींच्या अंतर्भावासह सविस्तर आराखडा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. सविस्तर आराखडा प्राप्त झाल्यानंतर तातडीने पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.