शिवसेनाप्रमुख स्मारकाचा विषय सुटला, मात्र महापौर निवासस्थानाचे काय?

0

मुंबई । शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी मुंबई महापालिकेच्या महापौरांचे निवासस्थान देण्याचा निर्णय झाला असून स्मारकाचे काम आता प्रगतिपथावर आहे. अशा वेळी महापौरांचे निवासस्थान कुठे असावे त्याबाबत प्रश्‍न निर्माण झाा होता. सुरुवातीला हा प्रश्‍न सोपा वाटत होता. मात्र, आता तो अधिक कठीण बनू लागला आहे. कारण अद्याप महापौरांना पर्यायी जागा उपलब्ध होताना दिसत नाही. पालिकेच्या मलबार हिल येथील बंगला रिकामा करण्यासाठी शिवसेनेचा पाठपुरावा सुरू असला, तरी प्रशासनाकडून यासाठी सकारात्मक दाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

मलबार हिल येथील पालिकेचा बंगला पालिकेच्या सेवेत नसतानाही येथे सनदी अधिकार्‍यांचा अद्याप मुक्काम आहे. हा बंगला महापौरांच्या निवासस्थानासाठी तत्काळ रिकामा करा, अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे. तसा पाठपुरावा सुरू आहे. मात्र, तरीही प्रशासनाकडून बंगला रिकामा करण्यासाठी पत्रव्यवहार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील सुधार समितीत माजी महापौर विशाखा राऊत यांनी महापौरांच्या पर्यायी बंगल्यासाठी प्रशासनाने तत्काळ व्यवस्था करावी, अशी हरकतीच्या मुद्द्याद्वारे मागणी केली होती. मलबार हिल येथील बंगला रिकामा करून तेथे महापौरांच्या बंगल्यासाठी व्यवस्था करण्याकडे शिवसेनेने प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

शासनाकडून दिरंगाई नको
पालिकेचे अधिकारी शासनाच्या जागेत राहत असेल तर त्यांना पालिकेच्या जागेत राहायला द्यावे. पालिकेकडे भरपूर जागा आहेत. मलबार हिल येथील पालिकेच्या जागेतील बंगल्यात राज्य सरकारचे अधिकारी राहत असतील, त्यांना सरकारने दुसरी जागा उपलब्ध करून द्यावी. मात्र, मुंबईचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांना पर्यायी बंगल्याची व्यवस्था करून देणे प्रशासनाला वाटत नाही का? असा प्रश्‍न विचारून विशाखा राऊत यांनी प्रशासनाला धारेवर धरले.