शिवसेना गटनेत्याच्या कार्यालयातील संगणक ‘जप्त’!

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्या कार्यालयातील संगणकाचा त्यांच्या अनुउपस्थितीत गैरवापर होत असल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने कार्यालयातील संगणक काढून नेला आहे. हा प्रकार शुक्रवारी सकाळी घडला. दरम्यान, गटनेते किंवा त्यांच्या स्वीय सहायकाला तसेच कार्यालयीन शिपाई यांना याबाबत कुठलीच कल्पना न देता प्रशासनाने संगणक काढून नेला आहे. त्यामुळे प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे.

गैरकारभार चव्हाट्यावर आणला म्हणून…
महापालिकेच्या तिसर्‍या मजल्यावर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, विविध विषय समितींचे सभापती यांची कार्यालये आहेत. याच मजल्यावर शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांचे कार्यालय आहे. माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर या कार्यालयात निवेदन तयार करत होते. भाजपच्या गैरकारभाराबाबत विविध वृत्तपत्रांमधून वृत्त प्रसिद्ध होत आहेत. स्थायी समितीच्या विरोधात आज विविध वृत्तपत्रातून वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळेच संगणक काढून घेतला असल्याची, जोरदार चर्चा पालिका वर्तुळात रंगली होती.

मी शिवसैनिक : भापकर
भापकर म्हणाले, मी करदाता नागरिक असून एक सजग नागरिक आहे. पालिकेत होणार्‍या गैरकारभाराला वाचा फोडण्याचे काम मी इमानदारीने करत आहे. भाजपच्या काळात मोठ्या प्रमाणात गैरव्यहार सुरु आहे. कार्यालय शिवसेना गटनेत्याचे आहे. मी शिवसेनाचा आहे. मी शिवसेनेकडून निवडणूक लढलो आहे. त्यामुळे कार्यालयातून एखादे जनहितार्थ निवेदन काढले म्हणजे काय झाले? आयुक्त श्रावण हर्डीकर सत्ताधार्‍यांची कळसुत्री बाहुली आहे. त्यांनी सांगितल्यामुळेच संगणक काढून घेतला आहे, हे अत्यंत चुकीचे आहे.

सुविधा काढून घेण्याची गरज नाही
सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, संगणकाचा गैरप्रकार होऊ नये. कलाटे यांच्या कार्यालयातील संगणक का काढून घेतला, याबाबत आपल्याकडे सविस्तर माहिती नाही. परंतु, कलाटे यांच्या सुविधा काढून घेण्याची काहीच गरज नाही.

सीमा सावळेंची तक्रार : आयुक्त
याबाबत आयुक्त म्हणाले, या संगणकाचा बाहेरील लोक गैरवापर करत आहेत, अशी तक्रार स्थायी समिती अध्यक्षांनी केली. त्यामुळे संगणक काढून घेण्यात आला आहे. कलाटे कार्यालयात आल्यावर संगणक दिला जाईल. दरम्यान, याबाबत शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही.