शिवसेना जिल्हाप्रमुख यांची अज्ञातांनी गाडी फोडली

0

धुळे । धुळे जिल्हा शिवसेना प्रमुखांची चार चाकी गाडीची मागील काच अज्ञात व्यक्तीने फोडल्याची घटना काल मध्यरात्री घडली असून समर्थक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने परिसरात जमले होते. या घटनेने जुने धुळे परिसर पुन्हा अशांत होण्याची शक्यता असल्याने तेथे पुन्हा अघटीत घडण्याआधी पोलिसांनी बंदोबस्त नेमावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. धुळे जिल्हा शिवसेना प्रमुख हिलाल माळी यांची (एमएम 18 एजी 9009) क्रमांकाची चारचाकी बोलेरो गाडी रविवारी रात्री गल्ली क्र.14 येथील माळी यांच्या घरासमोर उभी होती. मध्यरात्री नंतर अज्ञात व्यक्तीने माळी यांच्या गाडीच्या मागील बाजूची काच फोडली. हा प्रकार आज सकाळी त्यांना लक्षात आल्यानंतर हिलाल माळी यांचे समर्थक व कार्यकर्ते जुने धुळे भागात मोठ्या संख्येने जमले होते.

हल्लेखोरांना शोधून काढण्याची मागणी
काल रात्री सुमारे दोन वाजेनंतर आमच्या बोलेरो गाडीची काच फोडली. नेहमीप्रमाणे आमच्या विरोधकांचे हे कृत्य असल्याचा आम्हाला दाट संशय आहे. गाडीचा काच फोडून अज्ञात व्यक्ती मोटरसायकलवरुन पसार झाल्याची माहिती मला परिसरातील लोकांनी दिली. हा नेहमीचाच त्रास आहे. सामाजिक व राजकीय जीवनात आम्ही काम करायचे की नाही? असा प्रश्‍न उपस्थित होतो. आम्ही विचलीत झालो पाहिजे, आमची मानसिकता बिघडली पाहीजे, असा विरोधकांचा हेतू आहे. मात्र, आम्ही अशा किरकोळ दहशतीने विचलित होणार नाही. जनतेची सेवा सुरुच ठेऊ. या प्रकरणी तक्रार पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी याबाबत तपास करुन आरोपींना शोधून काढणे गरजेचे आहे.