मुंबई । मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या मतदार यादीत घोळ झाल्याने अनेक मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता आलेला नाही. निवडणूक आयोगाने या मुद्याकडे लक्ष न दिल्यास शिवसेना न्यायालयात जाणार असल्याचा इशारा शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी मुंबईमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या गोंधळाबाबत ते पत्रकारांशी बोलत होते. घाटकोपर येथील वॉर्ड नंबर 127 मध्ये मतदार यादीत घोळ झाल्याने रांगेत असलेल्या मतदारांना 2 तास थांबावे लागले. या वॉर्डात पुन्हा मतदान घेण्याची मागणीही स्थानिक नागरिकांनी केली आहे. तसेच देवनार इथल्या वॉर्ड क्रमांक 140 येथे तब्बल दोन हजार मतदारांची नावे यादीतून गायब झाल्याचे सांगण्यात येत आहे.विधानसभा निवडणुकीनंतर मतदार याद्या नियमित केल्यानंतर तब्बल 11 लाख मतदारांची नावे वगळण्यात आली. मागील निवडणुकीत एक कोटी तीन लाख मतदारांची नोंद होती. मात्र या निवडणुकीत 92 लाख मतदारांची यादी प्रसिद्ध झाली आहे. म्हणजेच तब्बल 11 लाख मतदार एकाचवेळी गायब झाले आहेत. मात्र यामध्ये काही जण मृत असल्याचे किंवा काही नागरिकांनी मुंबई सोडून विरार, वसई, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-बदलापूर भागात स्थलांतर केल्याचे सांगण्यात येत आहे.
खासदार उदयनराजे भोसलेंच्या गाडीवर दगडफेक
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानेच उदयनराजेंच्या गाडीवर दगडफेक केल्याचा आरोप होत आहे.सातार्यातील जावळी तालुक्यातील खर्शी मुरा गावामध्ये दगडफेकीची घटना घडल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वसंत मानकुमरे यांनी दगडफेक केल्याचा आरोप होत आहे. मेढा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी उदयनराजे पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेही मेढा पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. सुदैवाने उदयनराजे भोसले यांना दुखापत झाल्याचं कोणतंही वृत्त नाही. दगडफेकीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
केंद्राबाहेर ठिय्या आंदोलन
गेल्या 2012 च्या महापालिका निवडणुकीत यादीत नावे होती. आम्ही मतदानही केले होते. मात्र यावेळी अचानक यादीतून नावे गायब झाल्याने मतदारांना मनस्ताप झाला. यादीत नावे नसलेल्या मतदारांनी मतदान केंद्राबाहेर ठिय्या आंदोलन केले
उल्हासनगरात पोलिसांची वृद्धाला मारहाण
उल्हासनगर येथील पॅनल 17 मध्ये मतदान करुन घरी जात असलेल्या जेष्ठ नागरिकाला पोलिसाने मारहाण केल्याचा आरोप होत आहे. पोलिस आणि नागरिकामध्ये मतदान केंद्रापासून 100 मीटरमध्ये प्रवेश करण्यावरुन वाद झाला. त्यानंतर ही मारहाण झाल्याचे म्हटले जात आहे.मतदान केंद्राजवळ माझे घर आहे, मला जाऊ दया असे वृद्धाने सांगितले. मात्र पोलिसाने आडमुठी भूमिका घेत जेष्ठ नागरिकाला मारहाण करत 100 मीटरच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, असा आरोप होत आहे.
भाजप उमेदवाराला मारहाण
सोलापुरात भाजप उमेदवाराला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे. विजापूर नाका पोलिसांनी सुभाष शेजवळ यांना मारहाण केल्याचा दावा केला जात आहे.सोलापुरातील प्रभाग क्रमांक 25 मधील मतदान केंद्रावर मारहाण झाल्याचा आरोप होत आहे. मतदान केंद्राजवळ जमाव गोळा करुन गोंधळ घालत असल्याने पोलिसांनी कारवाई केल्याचं सांगितले जात आहे. शूटींग घेणार्या वृत्तवाहिनीचा कॅमेराही काढून घेतल्याचे वृत्त आहे.