शिवसेना मनपात स्वतंत्र लढण्यासही तयार!

0

जळगाव : महानगरपालिका निवडणुक अवघ्या चार महीन्यांवर येवून ठेपली आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यामुळे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत बैठक घेतली जाईल व मनपा निवडणुकीत युती करण्याबाबत चर्चा केली जाईल. मात्र, यानंतरही युती न झाल्यास शिवसेना स्वतंत्र लढण्यास देखील तयार आहे. तसेच महापौर शिवसेनेचाच राहिल असा इशारा माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. शहरातील प्रभाग क्रमांक 26 मध्ये भाजपाचे स्वर्गीय नगरसेवक विजय गेही यांच्या रिक्त जागेसाठी 6 एप्रिल रोजी निवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या उमेदवाराच्या निश्‍चितीबाबत चर्चा करण्यासाठी सोमवार 19 रोजी 7 शिवाजीनगर या सुरेश जैन यांच्या निवासस्थानी शिवसेनेची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बैठकीला शिवसेनेचे माजी आमदार आर.ओ. पाटील, महापौर ललित कोल्हे, माजी उपमहापौर सुनील महाजन, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, नगरसेवक जितेंद्र मुंदडा आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना श्री. जैन म्हणाले की, इच्छुकांकडून उमेदवारीसाठी फिल्डींग लावण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेकडून निवडणुकीच्या दोन महिने अगोदर सर्व उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे. असेही त्यांनी सांगीतले.

गेहींच्या परिवाराविरोधात उमेदवार नाही
दोन महिन्यांपूर्वी झालेल्या मनपा पोटनिवडणुकीत आशा कोल्हे यांच्या विरोधात भाजपाने उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे प्रभाग 26 मधील विजय गेही यांच्या रिक्त झालेल्या जागेवर उमेदवार देण्यात येवू अशी विनंती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. त्यामुळे गेही यांच्या कुंटूबातील सदस्य भाजपाचे उमेदवार राहिल्यास त्यांचा विरोधात शिवसेनेकडून उमेदवार दिला जाणार नाही, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला असल्याची माहीती सुरेश जैन यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.