शिवसेना स्वबळावर लढणार ही ‘भगवी’ रेघ

0

शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची प्रतिक्रिया

पिंपरी-चिंचवड : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी 2019 ची लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वबळवार लढण्याची महत्वाची घोषणा केली आहे. त्यामुळे शिवसेना स्वबळवार लढणार असून ही काळ्या दगडावरची भगवी ‘रेघ’ आहे, अशी मार्मिक प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. पिंपरीत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘पक्षाने निर्णय घेतला की आम्ही शिवसेनेचे सगळे मंत्री राजीनामा देण्यास तयार आहोत. राजीनामा देण्यास शिवसेनेचे मंत्री एक दिवसच काय एक तासही थांबणार नाहीत. पक्षाने निर्णय घ्यायचा अवकाश आहे. योग्यवेळेला पक्ष निर्णय घेईल.’

संपूर्ण कर्जमाफी झालीच नाही
सरकारच्या कामगिरीवर खूश आहेत का? या प्रश्‍नावर ते म्हणाले, ‘राज्य सरकारला तीन वषेर्र् झाली आहेत. यामध्ये प्रयत्न नक्की झाले आहेत. परंतु, सगळे समाधान आहे असे म्हणता येणार नाही. अनेक प्रश्‍न राहिले आहेत. शेतकर्‍यांची कर्जमाफीची घोषणा केली. मात्र अटी-शर्तीमध्ये शेतकर्‍यांना अडकविले. संपूर्ण सातबारा कोरा करण्याची शिवसेनेची मागणी होती. सरसकट कर्जमाफीची मागणी होती, ती झाली नाही. अनेक अटींच्या जंजाळामध्ये आणि ऑनलाईनच्या गुंत्यामध्ये शेतकरी अडकून पडला. त्यामुळे शेतक-यांची संपूर्ण कर्जमाफी झालेलीच नाही. याचे समाधान आम्ही कसे व्यक्त करणार? काही गोष्टीत त्यांनी प्रयत्न केले आहेत. त्यामध्ये त्यांना यश येवो, एवढ्याच शुभेच्छा देतो’’

आता युती नाहीच
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते की भाजप भीती दाखवून शिवसेनेला युती करण्यास भाग पाडेल. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा होती. परंतु, देसाई यांनी शिवसेना स्वबळवार लढणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.