भगवान पोखरकर यांची लागणार वर्णी
राजगुरुनगर : पंचायत समितीत शिवसेनेचे संख्याबळ अधिक आहे. खासदार शिवाजी अढळराव पाटील व आमदार सुरेश गोरे यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा झंझावात चालू आहे. तसेच काँग्रेसचा सदस्य शिवसेनेला मदत करणार आहे. त्यामुळे शिवसेनेचाच उपसभापती बिन विरोध होणार आहे, असा विश्वास खेड तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर यांनी व्यक्त केला आहे. खेड पंचायत समितीचे उपसभापती अमोल पवार यांनी राजीनामा दिल्याने शनिवारी (दि. 30) उपसभापतीपदासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन नियुक्ती केली आहे.
अमोल पवार यांनी दिला राजीनामा
अमोल पवार यांनी पंधरा महीने पद सांभाळले. त्यानंतर सदस्यांत ठरल्याप्रमाणे त्यांनी राजीनामा दिल्यानंतर निवडणूक होत आहे. शिवसेनेचे सदस्यबळ अधिक असल्याने यावेळी शिवसेनेचा उपसभापती होणार आहे. पंचायत समितीचे चौदा सदस्य आहेत. खेड तालुक्यात काँग्रेसचे एकमेव सदस्य अमोल पवार आहेत. शिवसेनेचे संख्याबळ मागील निवडणुकीत बहुमताला एकाने कमी पडत होते. त्यावेळी शिवसेनेने काँग्रेसचे पवार यांना संधी दिली. पण आता शिवसेनेचे संख्याबळ आठ आहे. भाजपचा एक, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार असे संख्याबळ आहे. शिवसेनेच्या सभापती सुभद्रा शिंदे आहेत. दरम्यान, उपसभापती पदासाठी नायफड गणाचे शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य भगवान पोखरकर यांची वर्णी लागण्याची शक्यता असुन त्यांनी सर्व सदस्य सहलीला नेले असल्याची चर्चा आहे.