शिवसेनेचा वचननामा जाहीर!

0

जळगाव । जिल्ह्यांत शिवसेना भाजपासोबत न जानता स्वतंत्र जिल्हापरिषदेची निवडणूक लढविणार आहे. या निवडणूकीचा जाहीरनामा आमदार किशोर पाटील, लोकसभा मतदारसंघ सहसंपर्कप्रमुख के.बी. नाईक, शिवसेना जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ, जिल्हासंघटक प्रमुख ज्ञानेश्वर जळतेकर, महानगर प्रमुख गणेश सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थित जिल्हा पत्रकार भवनात प्रसिद्ध करण्यात आला. याप्रसंगी आमदार किशोर पाटील यांनी जिल्ह्यात 67 पैकी 60 जागांवर उमेदवार दिल्याचे सांगितले. तसेच संपूर्ण जिल्ह्यांतून 30 ते 35 उमेदवार निवडून येवून जिल्हा परिषदेवर शिवेसेनेची सत्ता येणार असल्याचा दावा केला.

स्वतंत्र निवडणुकीमुळे उत्साह

शिवसेनेच्या वचननाम्यात सर्वंच घटकांना समावून घेण्याचा प्रयत्न केलला आहे. यात शेती सिंचन व पाणी पुरवठा, रस्ते विकास, विज, आरोग्य व पशूसंवर्धन, ग्रामविकास, शिक्षण, समाजकल्याण व महिला बालकल्याणसइ इतर विषयांना प्राधान्य देण्यात येणार आहे. गेल्या पंधारावर्षांत प्रथमच शिवेसनेना आपला स्वंतत्र प्रसिद्ध केला आहे. शिवसेनेने आतापर्यंत भाजपासोबत युती करूनच जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक लढविली होती. मागील पंचवार्षिकेत स्वंतत्र लढून भाजपासोबत येवून जिल्हा परिषदेची सत्ता काबीज केली होती. शिवसेनेने स्वंतत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा प्रत्येक गावांना जोडणार्‍या रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरणासह इतर सुविधा देण्याचे वचन शिवसेनेने दिले आहे.

राज्यप्रमाणे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचा कारभार

भारतीय जनता पक्षाचाच जिल्हा परिषदेवर अध्यक्ष राहीला असून त्यांच्या कार्यकाळात केवळ माजी मंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मतदार संघातील कामे करण्यात आल्याचा आरोप आमदार किशोर पाटील यांनी वाचननामा प्रसिद्ध करतांना केला. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा असल्यानेच 50 टक्के निधी हा खडसे व महाजन यांच्या मतदार संघात खर्च करण्यात आला असल्याचे आमदार पाटील यांनी निर्देशनास आणून दिले. राज्यात ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष कार्य करीत आहे त्याच प्रमाणे त्यांनी जिल्हा परिषद चालविल्याचा आरोप यावेळी आमदार पाटील
यांनी केला.

प्रचारासाठी येणार स्टार प्रचारक

भारतीय जनता पक्षातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्ह्यात प्रचारासाठी आणण्यात आले असतांना आम्ही उद्धव ठाकरे यांना बोलविणार नसल्याचे आमदार पाटील सांगत आम्ही प्रचारासाठी समर्थ असल्याचे सांगितले. जिल्ह्यांत शिवसेनेच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक म्हणून पर्यावरण मंत्री रामदास कदम, डॉ. अमोल कोल्हे, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे , शिवसेना उपनेते हाजी अराफत, शिवसेना नेते नितीन बानगुंडे पाटील आदी जिल्ह्यांत हजेरी लावणार असल्याचे आमदार पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहिर केले. शिवसेनेचे जिल्ह्यात अमळनेर तालुक्यात उमेदवार दिला नसल्याचा आमदार पाटील यांनी सांगितले.