कोल्हापुर । सार्वजनिक कार्यक्रमांत जय महाराष्ट्रची घोषणा दिल्यास लोकप्रतिनिधींची पदे रद्द करण्यात येतील, असा इशारा कर्नाटक सरकारने दिल्यानंतर या दडपशाहीविरोधात बेळगावातील मराठी जनतेने काढलेल्या मोर्चात शिवसेनेचे नेते आणि मंत्री दिवाकर रावते सहभागी होण्यासाठी गेले होते. पण बेळगावला जात असतानाच पोलिसांनी रावतेंना रोखले. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिवसेनेवर जोरदार टिका केली आहे. बेळगावमधील मोर्चात सहभागी होण्यासाठी जाणे ही रावते यांची राजकीय नौटंकी होती. त्यांनी पोलिसांचे कडे तोडून जायला हवे होते, असे म्हणून आता शिवसेनेचा वाघ मवाळ झाला आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संघटनात्मक पातळीवर बदल करणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते. येत्या 28 तारखेपासून राज्याच्या दौर्यावर निघणार आहे. त्यात शेतकर्यांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडे तरुणांचा ओढा अधिक आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच यावेळी तटकरे यांनी सीमाभागात जय महाराष्ट्रच्या घोषणेवरून सुरू झालेल्या वादात उडी घेतली. सार्वजनिक कार्यक्रमांत लोकप्रतिनिधींनी जय महाराष्ट्र अशी घोषणा देऊ नये, तसे केल्यास त्यांची पदे रद्द करण्यात येतील, असा इशारा कर्नाटकचे मंत्री बेग यांनी दिला होता. त्यानंतर बेळगावातील मराठी जनतेमध्ये प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटले होते. तसेच कर्नाटक सरकारच्या दडपशाहीविरोधात तेथील मराठी जनतेने काढलेल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी शिवसेना नेते दिवाकर रावते बेळगावच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना कागलमधील कोगनोळी फाट्याजवळ रोखले. रावते आणि कोल्हापूरचे पक्ष जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना बेळगावमध्ये दाखल होण्यास परवानगी नाकारली. 27 मेपर्यंत ही प्रवेशबंदी लागू राहणार आहे. पोलिसांनी ठाम भूमिका घेतल्याने दिवाकर रावते यांना पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने परतावे लागले होते. यावरून तटकरे यांनी शिवसेना आणि रावते यांच्यावर टीका केली आहे.तसेच शेतकरी प्रश्नावर बोलताना त्यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावरही तोंडसुख घेतले. शेट्टी यांना शेतकर्यांशी देणे-घेणे नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.