धुळे । आ म्ही आंदोलन करणारे आहोत, गुन्हेगार नाहीत. तुमचे तहसिलदार, प्रांताधिकारी यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे असतात त्यांना तुम्ही अशा पध्दतीने वागवतात का? आम्ही तर शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी लढत आहोत. पोलिस बोलाविण्याची भाषा आणि आम्हाला आत टाकण्याची भाषा करु नका, आत्महत्या करण्यापेक्षा ‘आत’ राहण्यात काहीच गैर नाही. तुम्ही शेतकर्यांना पिळणार्या बँक अधिकार्यांना ताबडतोब बोलवा अशा प्रश्नांची सरबत्ती जिल्हाधिकार्यांवर करत शिवसेनेने आज जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले होते.
चर्चेदरम्यान वादाची ठिणगी
यानंतर आज शानाभाऊ सोनवणे हे जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यासाठी गेले. त्यांनी मागील मागणीची आठवण करुन देत स्टेट बँकेच्या अधिकार्यांना चर्चेसाठी बोलवा असा आग्रह धरला. मात्र जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी स्टेट बँकेचे अधिकारी माझ्या अधिकार कक्षेतले नाहीत. त्यामुळे त्यांना बोलावता येणार नाही असे सांगितले. त्यानंतर सोनवणे यांनी तुमच्या अधिकार कक्षेत नसले तरी तुम्ही विनंती केली तर ते नक्कीच येतील, जिल्हाधिकार्यांच्या मान ठेवतील त्यामुळे तुम्ही त्यांना बोलवाच असा आग्रह सोनवणे यांनी धरला. त्यातुन वादाची ठिणगी पडली.
पिळवणुकीमुळे होताहेत आत्महत्या
या प्रकरणामुळे जिल्हाधिकार्यांच्या दालनात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आणि पंचायत समिती सदस्य शानाभाऊ सोनवणे आणि जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्यात चांगलीच खडाजंगी उडाली होती. शेतकरी आत्महत्येला फक्त कर्जाचा डोंगर कारणीभुत नाही तर बँकेकडून होत असलेली पिळवणूक देखील जबाबदार आहेत. धुळे जिल्ह्यातील बँकांमध्ये सावळा गोंधळ सुरु आहे. त्याबाबत बँकेच्या अधिकार्यांना बोलावून शेतकरी आणि आमच्यासोबत तुमच्या मध्यस्थीने चर्चा घडवून आणा आणि मार्ग काढा अशी विनंती शानाभाऊ सोनवणे यांनी काही दिवसापुर्वी जिल्हाधिकार्यांना एका विनंती पत्राद्वारे केली होती.
दुपारपर्यंत खंडाजंगी होती सुरू
जिल्हाधिकारी मागणी मान्य करीत नसल्याने शानाभाऊ यांनी कार्यकर्त्यांसोबत दालनातच ठिय्या मांडून आंदोलनाला सुरुवात केली. दालनात आंदोलन करता येणार नाही असे जिल्हाधिकार्यांनी सांगितल्यानंतर वातावरण आणखीनच तणावपूर्ण बनले. लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करीत आहोत, तो आमचा अधिकार आहे. तुम्ही तो हिरावून घेवू शकत नाहीत. आंदोलन करणारे ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने जिल्हाधिकार्यांनी पोलिसांना बोलवितो असे सांगितले. यावरुन आंदोलन करणारे आणखीनच आक्रमक झाले. आम्हाला आत पाठवा काही फरक पडणार नाही. आत्महत्या करण्यापेक्षा ‘आत’ जाण्यात गैर काय असा सवाल आंदोलन कर्त्यांनी केला. दुपारी उशिरापर्यंत ही खडाजंगी सुरुच होती.