मुंबई – शेतकरी संपावर गेलेला असताना आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची भूमिका शिवसेनेने आधीच जाहीर केलेली आहे. त्यातच आता मी कर्जमुक्त होणारच, या शिवसेनेने छेडलेल्या अभियानाला भरघोस प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत आम्ही १० लाख शेतकऱ्यापर्यंत पोहचलो असल्याची माहिती शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी शुक्रवारी दिली.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिक येथे कृषी मेळावा घेऊन कर्जमुक्तीसाठी रणशिंग फुंकले होते. शेतकरी संकटात सापडला असताना सरकार गप्प बसणार असेल तर शिवसेना कदापि सहन करणार नसल्याचे त्यांनी सरकारला सांगितले होते. शेतकऱ्यांच्या भावना व वेदना मुख्यमंत्र्यांना कळाव्यात यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी थेट बांधावर जाऊन प्रश्नोत्तराच्या स्वरूपात त्यांची मते गोळा करत आहेत. त्याच्या माध्यमातून सरकारच्या सर्व योजनांचा पंचनामा करण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून ५० हजार, असे जिल्ह्यातून पाच लाख अर्ज एकत्रित केले जाणार आहेत. शेतकऱ्यांकडून भरून घेण्यात येणारे अर्ज १५ जूननंतर शिवसेनेच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाकडे जमा करण्यात येणार आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ते मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.