शिवसेनेच्या मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

0

मुंबई – गुरूवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर शुक्रवारी सकाळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा, निवासस्थानी भेट घेऊन सरकारी कारभारात शिवसेनेच्या आमदारांना डावलले जात असल्याची तक्रार केली.

राज्यात युतीचे शासन असले तरी भारतीय जनता पक्षाच्या आमदार आणि मंत्र्यांनाच सर्वाधिक निधी मिळतो आणि शिवसेना नेत्यांना फक्त आश्वासन मिळते अशीही तक्रार या मंत्र्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी यापुढे असे होणार नसल्याचे ठोस आश्वासन दिल्याचे बैठकीनंतर विधानभवनात बोलताना पर्यावरणमंत्री रामदार कदम यांनी सांगितले. सुभाष देसाई, रामदास कदम, दिवाकर रावते, विजय शिवतारे आदी मंत्री या बैठकीत होते.

निधी वाटपाबद्दल कोणावरही अन्याय करणार नाही. हे सरकार शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार आहे. यापुढे शिवसेना-भाजपच्या आमदारांना समान निधी दिला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर पूर्ण विश्वास आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पावर सेनेने नाराजी व्यक्त केली होती. तीही या बैठकीनंतर दूर झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी कर्जमुक्तीच्या मागणीवर सभागृहात लेखी आणि तोंडी आश्वासन दिलेले आहे, असेही कदम यांनी सांगितले.