जळगाव। शेतकर्यांना संपूर्ण कर्जातुन मुक्त करावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेती मालाला हमी भाव देण्यात यावा आदी मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे रविवारी 4 रोजी सकाळी 9 वाजता पारोळा तालुक्यातील दळवेल येथील राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार चिमणराव पाटील यांनी केले. जिल्ह्याभरातील हजार-दीड हजार शेतकरी महामार्गावर जमले. शेतकर्यांनी रास्तारोको करून, भाजीपाला, दुध रस्त्यावर फेकला. रास्तारोकोमुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूने पाच किलोमीटर अंतरापर्यत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या.
त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. अर्धातास आंदोलन सुरू होते. आंदोलन कर्त्यांनी शासनविरोधी घोषणा दिल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्या रमाबाई पाटील, दळवेलचे सरपंच रोहीदास पाटील, कृउबा सभापती अमोल पाटील, शेतकी संघाचे चेअरमन चतुर पाटील, सेनेचे तालुकाध्यक्ष प्रा.आर.बी.पाटील, माजी नगरसेवक राजू कासार, पंचायत समिती सदस्य जितेंद्र पाटील यांच्यासह दळवेल, मोंढाळे, सबगव्हाण, पिंपळकोठा, इंधवे, जिराळी, सुमठाणे, बहादरपूर, शिरसोदे या भागातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.