हडपसर : मुंढव्यातील मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये केशवनगर-मुंढवा येथील शिवसैनिकांतर्फे माजी आमदार महादेव बाबर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. खड्ड्यांत शिवसेनेने झाडे लावण्याचा एककलमी कार्यक्रम राबवून निषेध व्यक्त करत आंदोलन केले. महापालिकेतर्फे गेल्या पाच वर्षांत चार वेळा हा मुख्य रस्ता दुरूस्त केला गेला. त्यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. तरीही या मार्गावर खड्डे पडले आहेत. वाहतूक पोलिसांनी खड्डे बुजविले पण महापालिका प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे.
मुंढवा येथील महात्मा फुले चौक ते रेल्वे उड्डाणपूल दरम्यान मोठमोठे खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यांमुळे दुचाकीचालकांना अपघातास सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विक्रम लोणकर, देवेंद्र भाट, दादा आहिरे, दिलीप व्यवहारे, विलास लोणकर, बाळासाहेब सणस, सुरज मोराळे, सोमनाथ गायकवाड, ज्ञानेश्वर भोईटे, विनोद गव्हाणे, सोमनाथ जंगले, विशाल वाडेकर, प्रकाश आहिरे, जितेंद्र तिकोने आदीशिवसैनिक उपस्थित होते.
मुंढवा नदीपूल ते रेल्वे उड्डाणपूल हा प्रमुख रहदारीचा मार्ग आहे. याच मार्गावर रेल्वे उड्डाणपुलाजवल दोन्ही बाजूने खड्डे पडले असून साइडपट्ट्या खचल्याने रस्ता खराब झाला आहे. शाळा, महाविद्यालयांकडे जाण्यासाठी मुले हाच मार्ग वापरतात. त्यांनाही खड्डे चुकवत गाड्यांचे उडणारे पाणी चुकवत कसरत करत जावे लागते. या खड्यांसाठी ठेकेदारांना की पावसाला जबाबदार धरणार? पावसाने उघडीप दिल्यावर पालिकेने दोन दिवसात संपूर्ण रस्त्यावरील हे खड्डे भरावेत अन्यथा शिवसैनिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे.