जळगाव। शासनाने कर्जमाफी जाहीर केली आहे मात्र कर्जमाफीची घोषणा करुन महिना उलटून चालला असून शेतकर्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नसल्याने शिवसेनेने शासनाचा विरोध करत बँकांसमोर ढोल बजाओ आंदोलन केले. सेना सत्तेतील सहभागी पक्ष असल्याने त्यांनी शेतकर्यांच्या प्रश्नाबाबत सरकारचा विरोध करत शासनाला धारेवर धरले पाहिजे. कर्जमाफी जरी जाहीर करण्यात आली असेल तरी बँकांना त्याबाबत अद्यापर्यंत कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाही. सेनेने शासनाचा विरोध न करता बँकांचा विरोध करण्याची जी नौटंकी सुरु केली आहे ती बंद करावी, असा घाणाघाती आरोप राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेवर केला. राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे राज्यभरात पक्ष संघटनाच्या कामाबाबत दौरा सुरु आहे. उत्तर महाराष्ट्र दौर्याप्रसंगी शहरातील कृष्णा लॉन येथे आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते.
जिल्ह्यात हे काय चालले आहे : जळगाव जिल्ह्यात अवैध धंद्यांना उत आले आहे. निकृष्ट दर्जाचे पोषण आहार पुरविण्यात येत असून शाळकरी मुलांच्या जीवाशी खेळ होत आहे. पाळधी येथील डॉ.व्ही.आर.पाटील यांना राज्यमंत्र्यांचा (ना. गुलाबराव पाटील यांचे नाव न घेता) वाहन चालक तुमचा दाभोळकर करुन टाकू अशी धमकी देतो. या विषयी विधीमंडळात लक्षवेधी मांडु असे सांगत, जिल्ह्याला दोन-दोन मंत्री लाभले असून जिल्ह्यात हे काय चालू आहे असा सवाल अजित पवार यांनी यावेळी केला.
पक्ष संघटन मजबुत करा
जिल्ह्यात 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे 6 आमदार निवडून आले होते. मात्र आज जिल्ह्यात पक्षाचा केवळ एकच आमदार असल्याने पक्षांची स्थिती जिल्ह्यात नाजुक आहे. कार्यकर्तेे, पदाधिकारी यांनी सर्व हेेवे दावे दुर सारुन पक्ष संघटनासाठी एकत्र येऊन काम करण्याचे गरज असल्याचा सुर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या मेळाव्यात निघाला. जिल्ह्यात पक्षांतर्गत हेवा दावा असल्याने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. जनता विद्यमान सरकारला कंटाळली असून जनता पर्यायी पक्ष शोधत असल्याने राष्ट्रवादी पर्याय ठरु शकते. त्यासाठी परिश्रम घेणे गरजेचे असल्याचे वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.
मुंबई मनपाने पैसे द्यावे
शिासनाने कर्जमाफीची घोषणा जाहीर केली आहे, मात्र शासनाला आर्थिक चणचण जाणवत असल्याचे दिसून येते. कर्जमाफीसाठी 34 हजार कोटीची आवश्यकता आहे. येवढी मोठी रक्कम उभी करणे शासनापुढे आजच्या घडीला आव्हानात्मक आहे. दुसर्या बाजुला शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महानगर पालिकेकडे 60 हजार कोटीची ठेव जमा असून उध्दव ठाकरे यांनी शासनाला 34 हजार कोटी रुपये व्याजाने देऊन सहकार्य करावे. मात्र शिवसेनेची ही दानत नसून केवळ सत्तेत राहून विरोधाची भूमिका सेना घेत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
सत्ताधार्यांनी आश्वासने पाळावी
कोपर्डी येथील घटनेला वर्ष पुर्ण होत आले आहे. कोपर्डी अत्याचार प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून पिडीतेला न्याय देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले होते. मात्र या घटनेला एक वर्ष होत चालले असून अद्यापही गुन्हेगाराला शिक्षा झालेली नाही. सामाजिक सलोखा निर्माण करण्याचे आश्वासन निवडणूक काळात भाजपाने दिले होते. मात्र आज गोहत्येंच्या नावाखाली मागासवर्गीय, अल्पसंख्याक समाजबांधवांवर अन्याय होत असल्याने सत्तेत येण्यासाठी दिलेले आश्वासने पुर्ण करावे, असे अजित पवार यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षांच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, आमदार डॉ. सतिष पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील, युवती अध्यक्षा स्मिता पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी खासदार वसंतराव मोरे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार राजीव देशमुख, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील, अनिल भाईदास पाटील, शिवाजी पाटील यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.