शिवसेनेला आत्ताच कशी राम मंदिराची आठवण झाली?-अजित पवार

0

खेड-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने परिवर्तन निर्धार यात्रा काढण्यात आली आहे. काल रायगडमधून त्याला सुरुवात झाली. दरम्यान आज राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. निवडणुका तोंडावर आली की शिवसेनेला राम मंदिराची आठवण होते. साडेचार वर्ष काय करत होते असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. खेड येथे जाहीर सभेत ते बोलत होते.

दरम्यान यावेळी त्यांनी हनुमानाची ‘जात’ काढली जात आहे, पण देवांच्या जाती कशाला काढता, असा सवालही त्यांनी भाजपाला विचारला आहे.

शहरांची नावे बदलली जात आहेत. नावे बदलून समस्या सुटणार आहे का? नवीन शहरे करा. यातून काय साध्य केले जात आहे असा सवाल त्यांनी विचारला. निवडणुका नसतानाही किंवा आचारसंहिता नसतानाही पोलीस शुटिंग करत आहेत. ही काय लोकशाही आहे का? कोणाच्या आदेशावर हे केले जात आहे. आम्ही सत्तेचा दुरुपयोग कधी केला नाही परंतू मागच्या दाराने ही आणीबाणी आणली जात आहे, हा भाजपचा डाव असल्याचा आरोप अजित पवारांनी केला.

जाहीर सभेच्या अगोदर खेड शहरात बैलगाडीतून अजितदादा पवार, सुनील तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची मिरवणूक काढण्यात आली. बैलगाडी हाकण्याचे काम विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. सभेत आमदार संजय कदम यांनी शिवसेना नेते आणि मंत्री रामदास कदम यांच्यावर तोफ डागली. तर आमदार भास्करराव जाधव यांनी भाजप-शिवसेनेच्या कारभाराचे वाभाडे काढले.