हे देखील वाचा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनेला टोला
निलेश झालटे,नागपूर: नाणारच्या मुद्द्यावरून सध्या मोठा गोंधळ चालला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सेनेला विश्वासात घेऊनच हा प्रकल्प पूर्ण करणारच असे संकेत दिले आहेत. सोबतच या प्रकल्पाच्या श्रेयावरून त्यांनी शिवसेनेला टोला देखील मारला आहे. शिवसेनेला नाणार प्रकल्पाचे श्रेय घ्यायचे नाही, त्यामुळे आम्ही या महत्वपूर्ण प्रकल्पाचे श्रेय घेत असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा प्रकल्प तडीस नेण्याचे संकेत दिले आहेत. ‘सुयोग’ निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी याबाबत भूमिका मांडली.
शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि खासदार विनायक राऊत यांनी नाणार रिफायनरी प्रकल्प कोकणात आणायचा प्रथम प्रयत्न केला असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान केले होते. याची आठवण मुख्यमंत्र्यांना करून देताच मुख्यमंत्री यांनी यावर म्हटले आहे कि, नाणार सारख्या महत्वपूर्ण प्रकल्पाचे श्रेय आम्ही शिवसेनेला देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शिवसेना हे श्रेय घेण्याच्या मनःस्थितीत नाही म्हणून आम्ही हे श्रेय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे .
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले कि, नाणारच्या प्रकल्पाबाबत आम्ही शिवसेनेशी चर्चा करू,चर्चेतून मार्ग काढू तसेच पावसाळी अधिवेशनाच्या नंतर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान ही याबाबत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतील असेही त्यांनी यावेळी सांगितले. नाणार बाबत आग्रही असल्याचे ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी मान्य केले. सरकारची यात कोणतीही आडमुठी अथवा इगोची भूमिका नाही. सेनेच्या सर्व शंकां वैज्ञानिक पद्धतीने दूर करण्याचा प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले.