धुळे। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर शेतकरी संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली असली, तर शेतकर्यांमध्ये संभ्रमाचं चित्र आहे. मात्र याला शिवसेनेने विरोध दर्शविला आहे. यासाठी त्यांनी धुळ्यात रास्तारोको, शिंदखेडा येथे पाण्यात उभे राहून आंदोलन केले. शिवेसेनेच्यावतीने चाळीसगाव चौफुली येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती. यावेळी पोलिसांनी 70 ते 80 शिवसैनिकांना ताब्यात घेतले होते.
राजकीय पक्षांचा पाठींबा
गेल्या तीन दिवसांपासून राज्यातला शेतकरी संपावर आहे. शेतकरी कर्जमाफी, दुधाला भाव मिळावा, शेतीमालाला हमी भाव मिळावा, शेतकर्यांना पेन्शन मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी राज्यातला शेतकरी संपावर उतरला आहे. विविध संघटनांचा आणि राजकीय पक्षांचा पाठींबा या शेतकर्यांचा संपाला मिळत आहे. त्यातच सत्तेत सहभागी असलेली शिवसेनाही संपकरी शेतकर्यांच्या पाठीशी उभी झाली आहे. शेतकर्यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
साहुर येथे तापी नदीपात्रात उभे राहून आंदोलन
शिंदखेडा। साहुर येथील तापी नदी पात्रात शेतकरी व शिवसेना पदाधिकार्यांनी पाण्यात उभे राहून आंदोलन केले. तसचे मंगळवार दि.6 रोजी पर्यंत कर्जमुक्त करण्याचा निर्णय शासनाने न घेतल्यास दि. 7 जून पासून पाण्यात उभे राहून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा व प्रसंगी जलसमाधी घेण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. शेतकर्यांनी पुकारलेल्या संपाला साहुर येथील शेतकर्यांनी व शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी पाठिंबा दिला असून शेतकर्यांना साहूर येथील तापी पात्रात उभे राहून शेतकर्यांसह शिवसैनिकांचे आंदोलन कर्जमुक्त करुन त्यांचा 7/12 कोरा करावा, जर शेतकर्यांना कर्जमुक्त करण शक्य होत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी साहुर येथील शेतकर्यांनी केली आहे. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व पं.स.सदस्य शानाभाऊ सोनावणे यांनी केले. तर आंदोलनाप्रसंगी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख राजू रगडे, युवा सेनेचे तालुकाप्रमुख मयूर निकम , विभाग प्रमुख गणेश भदाने, उपविभागप्रमुख ईश्वर महाले, साहुर गावातील शेतकरी विलास कोळी, लोटन पाटील, ज्ञानेश्वर कुँवर, शानाभाऊ शिरसाठ,कैलास शिरसाठ,ईश्वर वाकडे,रमेश सोनवणे,सुकदेव वाघ, हौदास शिरसाठ, हरचंद शिरसाठ, योगेश वाघ, योगेश सोनवणे, गंगाराम शिरसाठ, दयाराम सोनवणे, दुर्योधन सोनवणे,कैलास सोनवणे, बाळकृष्ण चित्ते, महेंद्र सोनवणे यांच्यासह आदी आंदोलनात सहभाग घेतला होता.
शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफीची मागणी
त्याचाच भाग म्हणून आज धुळे जिल्हा शिवसेनेने महामार्गावरील चाळीसगाव चौफुलीवर रास्तारोको आंदोलन केले. यावेळी महाराष्ट्र सरकारचा धिक्कार असो, शेतकर्यांवर अन्याय करणार्या सरकारचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली. शेतकर्यांचा सातबारा कोरा झाला पाहीजे. शेतीमालाला हमीभाव मिळायला हवा. शेतकरी हवालदिल झाला आहे. सततची नापिकी यामुळे शेतकर्यांवर कर्जाचा डोंगर वाढत असून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढतच आहे. जो पर्यंत शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळत नाही. त्यांच्या मागण्या सरकार पुर्ण करीत नाही. तो पर्यंत या सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, अशी प्रतिक्रीया जिल्हाध्यक्ष हिलाल माळी यांनी दिली. सेनेचे जिल्हाध्यक्ष हिलाल माळी, महेश मिस्तरी, संजय गुजराथी, किरण जोंधळे,गंगाधर माळी,कैलास पाटील, पंकज गोरे,कैलास मराठे, सिद्धार्थ करनकाळ, नरेंद्र अहिरे, रामदास कानकाटे, प्रफुल्ल पाटील आदींसह शिवसैनिकांनी रास्ता रोको केला. पोलिसांनी आंदोलनकर्त्या शिवसैनिकांना ताब्यात घेत वाहतूक सुरळीत केली.