मुंबई : मुंबईच्या अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या मुद्यावरून गेल्या काही दिवसांपासून नवे वादंग सुरू होण्याची चिन्हे असताना सुमारे तीन हजार कोटी रुपयांच्या या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून शिवसंग्रामचे आ. विनायक मेटे यांना दूर करण्याच्या हालचाली भारतीय जनता पक्षात सुरु असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मेटे यांच्या नाराजीत भर पडली आहे. भाजपाच्या येत्या 12 तारखेला होणार्या प्रदेश कार्यकारीणीच्या बैठकीत भाजपाच्या मित्रपक्षांतून येणार्यांना महापालिका आणि जिल्हापरिषदांच्या निवडणुकीत भाजपाच्या चिन्हावर तिकीट देण्याची रणनीती तयार केली जात असून त्यात शिवसेनेच्या समोर उमेदवार देताना बहुतांश ठिकाणी त्या त्या राजकीय स्थिती नुसार मित्रपक्षातून नाराज असलेल्या घटकांना सामावून घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यात रासप शिवसंग्राम आणि जनसुराज्य पक्षसह मनसे शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादीतून येणार्या उमेदवारांना तिकीटे देण्याची रणनीती आखली जात असल्याचे या
सूत्रांनी सांगितले.
विश्वासू नेत्याच्या हाती धुरा देण्याचा डाव
मागील महिन्यात शिवस्मारकाच्या भुमीपूजन आणि जलपूजनाचा कार्यक्रम 24 डिसेंबर रोजी होता त्यापूर्वी आदल्या दिवशी राज्यभरातून आलेल्या शिवकलशाच्या मिरवणूकीच्या आणि कलशपूजनाच्या कार्यक्रमावर भारतीय जनता पक्षाने ताबा घेतल्याचे दिसल्यानेही मेटे नाराज झाले होते त्यावेऴी प्रत्यक्ष कार्यक्रमात मेटे यांना वगळण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आयत्यावेळी त्यांना मोदी यांच्यासोबत घेवून जाण्याचे काम मुख्यमंत्र्यानी केल्याने त्यांची नाराजी तात्पुरती दूर करण्यात आली. मात्र मेटे यांनी आदल्या दिवशी कार्यक्रमातून काढता पाय घेतला होता ही गोष्ट भाजपच्या काही नेत्यांना खटकली होती. सुमारेतीन हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पात भाजपाला स्वत:च्या पक्षातील विश्वासु नेत्यांच्या हाती धुरा देण्याची इच्छा असल्याने येत्या काळात मेटे यांना या पदावरून दूर केले जाण्याची शक्यता असल्याचे या सूत्रांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून शिवस्मारकाच्या निधीच्या मुद्यावर शरद पवार यांनी सरकारवर टिका केली होती. त्यानंतर अरबी समुद्रातील स्मारक उभारण्याबाबत फिजीबिलीटी अहवालच नसल्याचा आरोप करत राज ठाकरे यांनी सरकारने यावर भुमिका व्यक्त करावी अशी मागणी केली.