शिवाजीनगरातून रोकडसह दोन मोबाईल चोरी

0

जळगाव। शिवाजीनगरातील भुरे मामलेदार प्लॉट परिसरातील घरातून अज्ञात चोरट्यांनी दोन मोबाईल व साडेतीन हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात घरमालाकाने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगरातील भुरे मामलेदार प्लॉट परिसरातील बंटी किराणा दुकानाजवळ प्रमोद टेकचंद परदेशी (वय-36) हे पत्नी रुपाली व मुलं-बाळांसोबत राहतात. गुरूवारी 25 रोजी रात्री जेवण झाल्यानंतर परदेशी कुटूंबिय टिव्हीवर चित्रपट पाहत होते. चित्रपट पाहिल्यानंतर प्रमोद परेदशी हे रात्री 1 वाजेपर्यंत मोबाईलवर गाणे ऐकल्यानंतर ते मोबाईल बाजुला ठेवून झोपून गेले. यातच मध्यरात्री चोरट्यांनी घरात प्रवेश करत दोन मोबाईल व साडे तीन हजार रुपये चोरून पसार झाले.

शहर पोलिसात गुन्हा दाखल
शुक्रवारी पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास प्रमोद यांना अचानक जाग आल्याने त्यांनी त्यांचा मोबाईल शोधला. परंतू तो मिळून आला नाही. यानंतर त्यांनी पत्नी रूपाली यांना उठवून मोबाईल मिळत नसल्याचे सांगितल्यानंतर दोघांनी मोबाईलचा शोध घेतला असता ते मिळून आले नसल्याने मोबाईल चोरीला गेल्याची खात्री झाली. तर भिंतीवर टांगलेली पॅन्टही तपासणी केल्यानंतर त्यातील साडेतीन हजार रुपये चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर प्रमोद परदेशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.