जळगाव । जिल्हा दूध संघाच्या आवारातील जिल्हा बॅँकेची शाखा चोरट्यांनी फोडल्याची घटना सोमवारी सकाळी पावणे अकरा वाजता उघडकीस आली. चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप कडी कोयंडासह तोडले असून बाहेरील सीसीटीव्ही फुटेजही तोडले आहेत. दगडांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यात चोरट्यांना अपयश आल्याने त्यातील साडे पाच लाख रुपयांची रोकड सुरक्षित राहिली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जिल्हा दूध संघाच्या आवारातच जिल्हा बॅँकेची शाखा आहे. शनिवार व रविवार दोन दिवस बॅँकेला सुटी होती. त्यामुळे सोमवारीच ही बॅँक उघडली. शाखा व्यवस्थापक लक्ष्मण हेमचंद भोळे, त्यांचे सहकारी आर.पी.जैन व एस.एस.खैरनार सकाळी पावणे अकरा वाजता बॅँकेत आले असता मुख्य दरवाजाचे कुलूप कडीसह तुटलेले होते तर आतमधील कपाट उघडे होते व तिजोरीचे हॅँडल तुटलेले व बाजूलाच सिमेंटचे दगड पडलेले होते. बॅँकेत चोरीचा प्रयत्न झाल्याचे लक्षात आल्यानंतर शाखा व्यवस्थापक भोळे यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती दिली.
सर्वात आधी कॅमेरा फोडला
चोरट्यांनी बॅँकेत प्रवेश करण्यापूर्वी खबरदारी म्हणून सर्वात आधी समोरच्या भींतीवर असलेला सीसीटीव्ही कॅमेरा फोडला. दोरीच्या सहाय्याने किंवा दगडाने हा कॅमेरा फोडण्यात आला असावा असा अंदाज प्रत्यक्षदर्शी केल्याने भींतीच्या शेजारी असलेल्या मेहंदीच्या झुडपात हा कॅमेरा आढळून आला. बॅँक व्यवस्थापकांनी हा कॅमेरा बॅँकेजवळ आणला. आतमध्ये लोखंडी कपाटाचे कुलूप तोडण्यात आले आहे. या कपाटात कागदपत्रे असल्याने चोरट्यांना तेथे काहीच हाती लागले नाही.