शिवाजीनगरात शॉर्टसर्कीटमुळे 12 घरे जळून खाक

0

जळगाव । शहरातील शिवाजीनगरातील भुरे मामलेदार प्लॉट भागात शॉर्ट सर्किटमुळे आग लागून यात 14 पार्टीशनची घरे जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी 9.45 वाजेच्या सुमारास घडली. यात एका सिलेंडरचा स्फोट झाला. मात्रसुदैवाने जिवीतहानी टळली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवाजीनगरातील भुरे मामलेदार प्लॉट येथे सतीश कंडारे (वय-60), यांचा प्लॉट असून या ठिकाणी त्यांनी 14 पार्टीशनची घरे उभारुन यातील काही घरे भाडेतत्वावर दिली आहेत. चेतन भगत, आत्माराम सोनार, मंगला सोनार, रफिक शेख, शारदा मिसाळ, ज्ञानेश्‍वर पाटील, संजू मिस्त्री, विष्णू कोळी, ज्ञानेश्‍वर शिंपी व नरेश बाविस्कर यांना ही घरे भाड्याने देण्यात आलेली आहेत. आज सकाळी 9.45 वाजेच्या सुमारास चेतन भगत हे राहत असलेल्या घरात शॉर्ट सर्कीट होवून आग लागली. घरे पार्टीशनची असल्याने आग तात्काळ पसरली. आगीत घरातील जिवनावश्यक साहित्यासह 12 घरे जळून खाक झाले. आग इतकी भयंकर होती की घरावरची पत्रे, रॅक, पलंग वाकले होते. आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आग लागल्याची माहिती कळताच शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदिप ठाकुर, सपोनि महेश जानकर, सपोनि सोनवणे, हेकॉ. अमोल विसपूते, रतन गिते, संजय शेलार, गणेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.

1 सिलेंडरचा स्फोट
आगीत गणेश आटोळे यांच्या घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत इतर घरातील सिलेंडर बाहेर काढल्याने पुढील हानी टळली. अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी ही आग आटोक्यात आणण्यात आली.

संसारोपयोगी वस्तूंचे वाटप
आगीत संसार उपयोगी साहित्य जळाल्याने धर्मरथ फॉऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील यांनी त्वरित जेवण उपलब्ध करून दिले तसेच सर्व लोकांची दोन वेळच्या जेवणाची सोय करून दिली आहे. विनायक पाटील, जितेंद्र कांकरिया, सतीश जवळकर, हेमराज सोनवणे, संदीप महाले, विजू चौधरी यांनी पूर्ण 8 दिवस जबाबदारी त्या लोकांची घेतली आहे.

पंचनामा व शहर पोलिसात नोंद
आगीच्या घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी भेट देवून पाहणी केली. याप्रकरणी शहर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. तहसिलदार अमोल निकम यांनी दुपारी जावून घटनास्थळ पंचानामा केला. शासनाकडून मिळणार्‍या आर्थीक मदतीचा धनादेश लवकरात लवकर देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सामाजिक संस्थांकडून मदतीचा ओघ
आगीत नुकसान झालेल्या नागरिकांना विविध सामाजिक संस्थांकडून मदत देण्यात येत आहे. धर्मरथ फाऊंडेशनकडून 8 दिवस दोन्ही वेळ जेवण, आरंभ प्रतिष्ठान व गणेश क्रीडा सांस्कृतिक मंडळामार्फत संसारपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. तसेच बुधवार 14 रोजी गायत्री फूल भांडाराच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्या मंगला बारी यांच्यातर्फे महिलांना साडी आणि परकर देण्यात येणार आहे. समाजवादी पार्टीचे डॉ.रागीब अहमद यांनी देखील भेट दिली असून दोन दिवसांनी मदत देणार असल्याचे सांगितले.