शिवाजीनगर उड्डाणपुलावरील 72 टन वजनाचे गर्डर काढले

0

100 वर्ष जुना ; 100 कर्मचारी ; पुल मोकळा करण्यासाठी तीन महाकाय क्रेनचा वापर

जळगाव – ब्रिटीशकाळात बांधलेल्या शिवाजीनगर उड्डाण पुलाचे बांधकाम करण्यासाठी आज रेल्वे लाईनवर असलेले गर्डर आज काढण्यात आले. हे काम करण्यासाठी मध्यरेल्वे विभागातर्फे पाच तासांचा कालावधी घेण्यात आला होता. परंतु रेल्वे विभागाच्या कर्मचार्‍यांसह अधिकार्‍यांनी अवघ्या दोन तासातच पुलावरील गर्डर काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले. दरम्यान या कामासाठी 100 कर्मचारी नेमण्यात आले होते.
सन 1913 साली बांधण्यात आलेल्या शिवाजी नगरच्या उड्डाणपुलाची कालमर्यादा संपल्याने पुलाचे बांधकाम केले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे प्रशासन यांच्यातर्फे या पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. मध्यरेल्वेच्या रेल्वेलाईनवरुन हा पुल गेलेले असल्याने जीर्ण झालेला पुल आज रेल्वे प्रशासनातर्फे काढण्यात आला. सकाळी 10.35 वाजता हा पुल काढण्याच्या कामाला सुरुवात झाली. सर्वात अगोदर पुलावरील गर्डरमध्ये अडकविलेले पॅनल गॅस कटरच्या सहाय्याने मोकळे केल्यानंतर गर्डर काढून टाकण्यात आले. पुलाची उभारणी करीत असतांना त्याठिकाणी टाकण्यात आलेले गर्डर एक क्रॉसमध्ये अडकविण्यात आले होते. त्यामुळे या पुलाला 100 वर्षेहून अधिक काळ झाला तरी कोणत्याच प्रकारचा धोका नव्हता अशी माहिती रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिली.

72 टन वजनी पुल मोकळा
रेल्वे लाईनवर असलेला पुलावर 10 टनाचे 4 पॅनल तर 16 टनाचे दोन गर्डर पुलावर टाकण्यात आले होते. पुलाचा सांगाडा हा सन 1913 मध्ये तयार झाल्याची तारीख गर्डरवर टाकण्यात आली आहे. हा सांगाडा काढण्यासाठी रेल्वे प्रशसानाने साडेचार तास कामाचे नियोजन केले होते. मात्र कर्मचार्‍यांनी सांगाडा काढण्याचे काम केवळ 2 तासातच पूर्ण करुन हा पुल मोकळा केला.

तीन महाकाय क्रेनचा वापर
पुलाचा सांगाडा काढण्यासाठी रेल्वेप्रशान व सार्वजनिक बांधकाम विभागाचा ठेकेदार असे दोघांचे सुमारे 100 अधिकारी व कर्मचारी याठिकाणी काम करीत होते. तसेच सांगाडा काढण्यासाठी कंत्राटदाराने मुंबई येथून तीन हजार टन उचलण्याची क्षमता असलेल्या तीन मोबाईल क्रेन मागविल्या होत्या. या क्रेनच्या सहाय्याने पुलाचा सांगाडा काढण्यात आला.

गर्डर काढण्यासाठी मेगा ब्लॉक
रेल्वे प्रशासनाने सकाळी 9 वाजेपासून मेगा ब्लॉक घेतलेला असल्याने सकाळी 8.30 वाजेपासून रेल्वे पोलिस त्याठिकाणी दाखल झाले होते. त्यानंतर 8.30 वाजता महाराष्ट्र एक्सप्रेस जळगाव स्थानकावरुन भुसावळकडे मार्गस्थ झाली. यानंतर 10.06 मिनीटांनी मालगाडी, 10.12 मिनीटांनी अमृतसर निमामोद्दीन सचखंड एक्सप्रेस मुंबईकडे रवाना झाल्यानंतर हा रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पोलिसांकडून रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला हा मार्ग बंद आहे. अशा मजकूराच्या पट्टया लावण्यात आल्या होत्या. 100 वर्षेपेक्षा अधिक काळ झालेल्या शिवाजीनगरचा पुल इतिहास जमा होत असतांना अनेक नागरिकांनी हा पुल तोडण्याचे काम बघण्यासाठी त्याठिकाणी गर्दी केली होती. अनेकांनी पुल तोडण्याचे छायाचित्रांसह व्हिडीओ देखील आपल्या मोबाईलमध्ये कैद करीत होते.